सातारा: उदयनराजे विरुद्ध नरेंद्र पाटील सामना
   दिनांक :12-Apr-2019
रात्री घरी जाताना एक खडू घेऊन जा आणि आपल्या घरातल्या भिंतीवर धनुष्यबाणाचे चिन्ह काढा आणि त्याच्याखाली लिहा ‘उदयनराजे हरू शकतात, मी त्यांना हरवणारच’ मग बघा कशी एनर्जी येते असा सल्ला राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

भिंतीवर पुसल्या जाणार्‍या खडूने ‘उदयनराजे हरू शकतात, मी त्यांना हरवणारच’ असं लिहायचं आणि रोज घरातून बाहेर पडताना भाजप आणि शिवसेनेचा बॅच खिशाला लावूनच घराबाहेर पडायचं, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी खास उपाय उदयनराजेंना पाडण्यासाठी कार्यकर्त्यांना सांगितला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी सातार्‍यातील वाई येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही टोला लगावला. शेवटच्या दिवशी शरद पवार बारामतीत सभा घ्यायचे आता तेच शरद पवार आपल्या मुलीसाठी मतदारसंघात चार-चार सभा घेत आहेत, असे ते म्हणाले. सातारा मतदारसंघातून शिवसेनेकडून माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना उदयनराजे यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे.
 
 
नरेंद्र पाटील माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र आहेत. सातारा, वाई, कोरेगाव, पाटण येथे माथाडी मतदारांवर नरेंद्र पाटील यांची पकड आहे. मराठा मोर्चे निघाले होते, त्यात सातारा पट्‌ट्यातील लोकांचा सर्वाधिक समावेश होता. त्यामुळे ही मतं नरेंद्र पाटील यांना मिळतील अशी अपेक्षा आहे. राज्य सरकारने यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकासमंडळाचं अध्यक्षपद दिल्यानंतर नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम ठोकला होता.