चीनमध्ये ‘अंधाधून’ची तुफान कमाई
   दिनांक :12-Apr-2019
अभिनेता आयुषमान खुरानाचा २०१८मध्ये प्रदर्शित झालेला ‘अंधाधून’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने चाहत्यांची मनं जिंकली होती. त्यानंतर गेल्याच आठवड्यात हा चित्रपट चीनमध्ये ‘पिआनो प्लेअर’ या नावाने प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात चीनच्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. विशेष म्हणजे भारतीय बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या तुलनेत हा आकडा दुप्पट होता. प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यातही ‘अंधाधून’ची घोडदौड सुरुच आहे.
 
 
पहिल्या पाच दिवसात ‘अंधाधून’ने चीनमध्ये ९५. ३८ कोटींची कमाई केली होती. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरव्दारे दिलेल्या माहितीनुसार ‘अंधाधून’ने आता पर्यंत चीनमध्ये तब्बल १३६.६४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे भारतीय बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या तुलनेत हा आकडा तिप्पट आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये भारतामध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची दोन आठवड्याची एकूण कमाई ही ४१.९० कोटी इतकी होती. मात्र चीनमध्ये हिच कमाई तिप्पट झाल्याची पहायला मिळली.
 
 
‘अंधाधून’ हा चित्रपट मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. आयुषमान खुरानासह राधिका आपटे, तब्बू सारखी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. भारतीय प्रेक्षकांची खूप चांगली पसंती या चित्रपटाला लाभली होती. त्यानंतर वर्षभराने हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय व्हायाकॉम १८ स्टुडिओने घेतला. चीनमध्ये प्रदर्शित झालेला हा व्हायाकॉम १८ स्टुडिओचा आणि आयुषमानचाही पहिलाच चित्रपट आहे.
याआधी चीनमध्ये आमिर खानच्या चित्रपटांची चलती पाहायला मिळाली होती. मात्र आता इतरही भारतीय चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरात ‘बजरंगी भाईजान’, ‘हिंदी मीडिअम’ यांसारखे चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाले या चित्रपटांनी चांगली कमाई चीनमध्ये केली.