ए. आर. रेहमान यांचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण
   दिनांक :12-Apr-2019
आपल्या संगीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार, गायक ए. आर. रेहमान यांनी आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ए. आर. रेहमान निर्मित ‘९९ साँग्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रेहमान यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटाची घोषणा केली आहे.
 
 
‘९९ साँग्स’ या चित्रपटाची निर्मिती रेहमान यांची ‘वाय. एम. मूव्हीज’ आणि जिओ स्टुडिओज मिळून करणार आहेत. ही एक प्रेमकथा असणार आहे. विशेष म्हणजे रेहमान यांनीच चित्रपटाची कथा लिहिली आहे. रेहमान यांचा चित्रपट म्हटल्यावर अर्थात संगीताचा त्यात महत्त्वपूर्ण भाग असेल. ‘या चित्रपटाच्या प्रेमकथेत संगीताची महत्त्वपूर्ण भूमिका आहे,’ असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. हिंदी, तामिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये कोणकोणते कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत याची माहिती अद्याप समोर आली नाही. येत्या २१ जून रोजी ‘९९ साँग्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.