तू घे भरारी...
   दिनांक :12-Apr-2019
  ऋचा मायी 
 
एक रम्य संध्याकाळ... एका फॅमिली फ्रेंडच्या वाढदिवशी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक वेगवेगळे मराठी लोकं भेटले. तिथे आलेली एक गोड, निरागस मुलगी पूर्णवेळ माझ्यासाठी एका आश्चर्यापेक्षा कमी नव्हती.
 
काय वेगळं होतं तिच्यात?
 
प्रकर्षाने जाणवणारं होतं तिचं व्यक्तिमत्त्व! आयुष्यात असलेल्या ताणाविषयी सतत बोलणारे लोकं काही नवीन नाहीत... म्हणून नवीन वाटला तो तिचा हसरा चेहरा, तिचे बोलके डोळे आणि प्रत्येक गोष्टीबद्दलची चेहर्‍यावरची प्रचंड उत्सुकता! मी तिच्याशी बोलायला सुरुवात केली. ती हटके होती. अघळपघळ बोलत होती. सहज गप्पांतही तिने सांगून टाकले, ‘‘ग्रामभारत या दुकानामधे मी काम करते.’’ मग ती त्यावरच थांबली नाही. ग्रामभारत, हे दुकानाचं नाव ऐकल्यावर माझ्या चेहर्‍यावर कुतूहल उमटले. मग तिने ते दुकान म्हणजे नेमके काय आहे, ते सांगून टाकले. म्हणजे नेमके दृष्यच उभे केले तिने तिच्या दुकानाचे. इतके नेटके की मी तिच्या दुकानाचा थ्री-डी नकाशाच काढू शकले असते! तिचं वागणं-बोलणं इतकं लोभसवाणं होतं की, तिचं बोलणं ऐकत राहावंसं वाटावं. खूप खूप वर्षांनी भेटलं कुणीतरी इतकं निरागस, इतकं खरं! सगळ्यात ज्या गोष्टीने मला विस्मयात टाकलं ते म्हणजे तिच्या कामाप्रती तिची असलेली श्रद्धा... तत्काळ मनात विचार आला, हिच्यासारखी १० टक्के लोकं समाजात असली, तर देश काहीच्या काही उंचीवर जाईल, यात काहीच शंकाच नाही!
 
तेवढ्यात तिच्या आईने सांगितलं की, तिच्यावरच्या सिनेमाचा (Raising The Bar) दिल्लीत प्रीमिअर आहे. तेव्हा मला अचानक आठवले की, नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते एका मुलीचा नॅशनल अवॉर्ड देऊन सत्कार झाल्याचे वर्तमानपत्रात वाचले होते आणि इतका वेळ कौतुकाने मी जिच्याकडे बघत होते ती तीच मुलगी होती- देवांशी जोशी...

 
 
तिचे आईवडील- रश्मी जोशी आणि अनिल जोशी. म्हणतात ना, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो. त्याला सुंदर आकार देऊन घडवण्याचं काम त्या मुलांच्या पालकांचं असतं... स्वतःच्या मुलीला तर त्यांनी घडवलंच आहे, पण कित्येक पालकांसाठी आज हक्काची जागा आणि प्रेमाचं मार्गदर्शन देण्याचं मोठं काम आज गेली कित्येक वर्ष ते, डाऊन िंसड्रोम पॅरेंटस्‌ सोसायटी, दिल्ली या अंतर्गत करत आहेत.
 
आमची ओळख वाढत गेली...
त्या दिवशी आयुष्यातला पहिला सिनेमाचा प्रीमिअर पाहायचा योग आला आणि तोही चित्रपटाच्या नायिकेसोबत बसून! अर्थात तो योग केवळ आला देवांशीमुळे...
सिनेमात ती आणि तिच्याबरोबर अजून पाच मुलं होती, त्या दिवशी आजपर्यंत ज्या स्थितीबद्दल मी फक्त ऐकलं िंकवा वाचलं होतं त्याबद्दल पूर्ण माहिती मिळाली, सगळ्या गैरसमजुती दूर होऊन.
त्यांच्या पालकांनी त्यांना समाजात सहजपणे वावरण्यासाठी काय आणि किती मेहनत घेतली; हे पाहून पालकत्व हे एक आव्हान आहे असं समजून जर समर्थपणे पेललं, तर आपण आपल्या मुलांना किती सक्षम बनवू शकतो, याचं चालतं बोलतं प्रात्यक्षिक दिसत होतं डोळ्यांसमोर...
 
मुलं जन्माला येणं ही कितीही शास्त्रीय घटना असली, तरी काही चमत्कारच असतात... एखादं मूल अमुक एक शारीरिक, मानसिक अवस्था घेऊन कसं काय जन्मतं? किंवा एखाद्या मुलाला काहीतरी विलक्षण गोष्टी कशा काय करता येतात?
जसं कोणी गणित विषयात वयाच्या तिसर्‍या-चौथ्या वर्षीच एकदम पारंगत असतं, कोणी जन्मत:च नृत्यकला किंवा गोड आवाजाची देणगी घेऊन जन्मलेलं असतं, कोणाला जन्मत:च सहावं बोट असतं... 

 
 
एकाच शास्त्रीय गणितावर आधारित असते ना मूल जन्मायची व्यवस्था? मग तरीही प्रत्येक मूल वेगळं...!
जरी आनुवंशिकतेने बरेच गुणदोष येतात, तरीही वर म्हटलेल्या सगळ्याच मुलांच्या आई-वडिलांमधे त्याच कला, वेगळेपणा दिसेलच असं नाही...
देवांशी जन्माला आली ती डाऊन्स सिन्ड्रोम नावाच्या शारीरिक, मानसिक अवस्थेसकट...
डाऊन्स सिन्ड्रोम म्हणजे काय? हे नुसतं गूगल सर्च केलं तर इत्थंंभूत माहिती मिळाली होती...
काय माहिती मिळाली नव्हती? िंकवा त्या माहितीवरून काय गैरसमज झाले होते? हे देवांशीला भेटल्यावर लक्षात आले.
पहिल्यांदा वाटलं की, कदाचित या प्रकारात वेगवेगळ्या लेव्हल्स असतील... पण, देवांशीची आई रश्मी जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे फारसा फरक नसतो, म्हणजे सौम्य, तीव्र असा...
 
मुख्य म्हणजे या मुलांना सहानुभूतीची अजीबात गरज नाही, गरज आहे ते समजून घेण्याची... योग्य वातावरण दिलं तर प्रत्येक डाऊन्स सिन्ड्रोम असलेलं बाळ देवांशीइतकंच सक्षम आणि स्वावलंबी आयुष्य जगू शकतो, हे जोशींनी सांगितलं.
आज इतक्या सगळ्या गोष्टींचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडतो की, दूर कुठेतरी गावात राहणारी एखादी व्यक्ती सोशल मीडियाच्या काळात दिल्लीपर्यंतची बातमी ठेवू शकते. अत्यंत जुजबी सभोवताल असणारी मुलगी, ‘मिस इंडिया’ बनायचे स्वप्न पूर्ण करू शकते. फार मोठा हात यामधे सोशल मीडियाचा आहे. जसा त्याचा उपयोग तुम्ही-आम्ही करतो तसाच तो देवांशीनेसुद्धा केला. तिच्या पालकांनी योग्य पद्धतीने तिला तो करू दिला. एखादी गोष्ट नकोच करूस, म्हणण्यापेक्षा सुयोग्य पद्धतीने कर, हे केव्हाही मुलांना पटकन रुचतं. त्यामुळे तोसुद्धा तिच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे, तिला बर्‍याच नवीन गोष्टींची ओळख करून देण्यासाठी...
 
कुठल्याही पालकांना आपल्या बाळाला कुठलंही शारीरिक किंवा मानसिक रीत्या जन्मतः काही वेगळेपण असेल, तर त्या गोष्टीला ताठ मानेनी स्वीकारल्यानंतर खरं म्हणजे त्या कुटुंबाची खर्‍या अर्थाने जगायला सुरुवात होते. जेव्हा आपण मोकळ्या मनाने असलेली परिस्थिती स्वीकारतो, तेव्हाच समाज त्याला स्वीकारू शकतो. स्वीकारतो हा शब्द देवांशीच्या बाबतीत थोडा कमी पडतोय्‌ मला...
 
कारण, नुकतंच इलेक्शन कमिशनने समाजातल्या प्रत्येक माणसाला मत देण्याचा अधिकार आणि व्यवस्था आहे, या जनजागृतीसाठी काढलेल्या व्हिडीओमधे इंटेलेक्चूअल डिसॲबीलीटी असलेल्या सर्वांना ती सुविधा मिळालेली आहे. मत देण्याचा त्यांचा अधिकार ते बजावू शकतात. हे सांगणारी प्रतिनिधी म्हणून देवांशीला खास घेण्यात आले आहे.
हे शक्य झाले, कारण तिच्यात जन्माच्या पहिल्या दिवसापासून तिला सर्वच गोष्टी करणे शक्य आहे, हा दृढ आत्मविश्वास ठासून भरण्यात आला. जितके दिवस त्या बाळातल्या वेगळेपणाला स्वीकारण्यासाठी पालक वाया घालवतात, तितके दिवस ते मूल घडवण्यातले वाया जातात. ज्या क्षणी पालकांना आपल्या पाल्याला कुठल्याही मदतीची गरज आहे हे कळेल, त्या क्षणापासून ती दिली जायला हवी.
 
आज अनिल जोशी व रश्मी जोशी अशा सर्व पाल्यांसाठी जे इंटलेक्च्युअल डिसॅबिलिटी या कक्षेत बसतात, त्यांच्या पालकांसाठी आणि सतत वेगवेगळ्या क्षेत्रांत अव्याहत काम करत आहेत. अशा विशेष मुलांचे जन्मदाते- पालक त्यांचा त्यांचा संघर्ष एकट्यानेच करत असतात. पाकी समाज त्यांच्याकडे केवळ दयाभूत नजरेनेच बघत राहतो. ते सारे एकत्र आले तर काय होऊ शकते, हे आता कळते आहे. नाहीतर आपल्या अशा अपत्यांचे नीट संगोपन करून ते आपले कर्तव्यच होते, म्हणत समाजाला ते न सांगणारेही आहेत. काही पालक तर असे आहेत की, आमच्यावर लेख लिहू नका, आमचे जाहीर कौतुकही करू नका, असे म्हणतात, कारण आता त्यांची ही वैशिष्ट मुलं शिकली आहेत. मोठीही झाली आहेत अन्‌ त्यांच्याकडे बारकाईने पाहिल्यावरच लक्षांत येतं की ती विशिष्ट आहेत. मग आमचा सत्कार केला किंवा जाहीर कौतुक केले तर मुलांना ते कळेल ती विशिष्ट आहेत म्हणून... त्यासाठी कौतुकही टाळणारे पालक आहेत.
 
असं म्हणतात की, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, दुसर्‍याला सल्ला देणं फारसं कठीण नसतं... पण, आज देवांशीच्या यशाने हे सिद्ध झालं आहे की, योग्य दिशा आणि प्रयत्न केले तर कुठल्याही परिस्थितीवर मात करणं शक्य आहे.
डाउन्स सिन्ड्रोमसकट जन्माला आलेल्या मुलांना सहज ओळखता येण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांचा चेहरा...
त्याव्यतिरिक्त एक वर्षात अनेकदा भेटायचा योग आलेली देवांशी, प्रत्येक भेटीत तिच्यातली एक नवीन थक्क करून टाकणारी चमक दाखवते.
 
दरवेळेस एक गोष्ट मात्र कॉमन, ती तिची कामाबद्दलची आत्मीयता. तिच्या पालकांच्या अहोरात्र मेहनतीला यश म्हणून देवाने तिला दिलेलं रिवार्ड की काय! देवांशी आज फ्युचर ग्रुपच्या बिग बाजारसारख्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळालेली (person with intellectual disabilities) पहिली मानकरी ठरली आहे.
स्वतःच्या प्रत्येक अडचणींवर मात करून झेप घेतलेल्या या मुलीला आयुष्यातल्या सर्व उत्तमोत्तम गोष्टी मिळतील, यात तिळमात्रही शंका नाही. आपल्यावर आलेल्या संकटांना न घाबरता आलेल्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं? हे स्वतःच्या उदाहरणाने सिद्ध केलेल्या देवांशीला तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
 
ते आकाशाला गवसणी घालणारे सुंदर पक्षी नेहमीच मला भुरळ घालतात. पण, एक लक्षात आलं...
खरंच उंच उडण्यासाठी नेहमीच पंखांची गरज नसते... आत्मविश्वासाने घेतलेली भरारी जास्त देखणी असते!