खाद्यसफर कोलंबियाची
   दिनांक :12-Apr-2019
पेपस चोर्रीऍडस (क्रिमी कोलंबियन पोटॅटोज) 
 
साहित्य - ८ मध्यम आकाराचे बटाटे, १ क्युब व्हेजिटेबल स्टॉक (क्युब मिळाला नाही तर घरी केलेला व्हेजिटेबल स्टॉक वापरू शकता), १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल, १ टेबलस्पून बटर, दीड कप टोमॅटो चिरून घेतलेले, १ जुडी पातीचा कांदा, २ लसूण पाकळ्या, १/२ कप डबल क्रीम, १/२ जुडी पालक धुऊन चिरून घेणे, १/२ कप किसून घेतलेले मोझरेला चीज, १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा पार्स्ले.  
 
 
कृती - बटाट्याची साले काढून घेणे. व्हेजिटेबल स्टॉक भांड्यात घेऊन त्यात बटाटे व थोडे पाणी घाला. भाड्यावर झाकण ठेवून बटाटे शिजवून घ्या. बटाटे शिजले की व्हेजिटेबल स्टॉकमधून बाहेर काढून घ्या. बटाटे शिजत असतानाच एका सॉसपॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल आणि बटर घ्या आणि मध्यम आचेवर गरम करून घ्या. त्यात कांदे आणि पातीचा कांदा बारीक चिरून घाला आणि तीन ते चार मिनिटे परतून घ्या. त्यात टोमॅटोचे तुकडे घाला आणि टोमॅटो शिजेपर्यंत मिश्रण परतून घ्या. टोमॅटो शिजले की त्यात लसूण बारीक चिरून घाला आणि जिरे घाला व एक मिनिट परतून घ्या.
 
नंतर त्यात चिरलेला पालक घाला. त्यात मीठ व काळीमिरी पूड घाला. पॅनवर झाकण ठेवून पालक शिजवून घ्या. पॅनवरचे झाकण काढा आणि गॅसची आच मंद करून घ्या. नंतर त्यात क्रीम घाला आणि पार्स्ले व चीज घाला व मिश्रण ढवळून घ्या. चीज वितळेपर्यंत मिश्रण शिजवून घ्या. सर्व्ह करताना बटाट्याचे मधून दोन भाग किंवा चार भाग करून घ्या आणि त्यावर हा सॉस घालून, वरून पार्स्ले घालून सर्व्ह करा क्रिमी कोलंबियन पोटॅटोज...