नक्षलवाद्यांचा विरोध झुगारून आमदार भीमा मंडावींच्या पत्नीचे कुटुंबीयांसह मतदान
   दिनांक :12-Apr-2019
रायपूर,
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी आटोपले. दरम्यान, पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार संपण्यापूर्वी काही वेळ आधी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील दंतेवाडा परिरसात बॉम्बस्फोट घडवून भाजपा आमदार भीमा मंडावी यांची हत्या केली होती. तसेच मतदानावर बहिष्कार घालण्याची धमकी ग्रामस्थांना दिली होती. मात्र, आमदार भीमा मंडावी यांच्या कुटुंबीयांनी घरावर दु:खाचे सावट असतानाही नक्षलवाद्यांच्या धमकीला न जुमानता गुरुवारी मतदानाचा हक्क बजावला.
 
 
 
छत्तीसगडमधील बस्तर लोकसभा मतदारसंघात येणार्‍या दंतेवाडामधील श्यामगिरी येथे नक्षलवाद्यांनी मंगळवारी आमदार भीमा मंडावी यांच्या ताफ्याला लक्ष्य करीत आयईडी स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात आमदार भीमा मंडावी, त्यांचा वाहनचालक आणि तीन पोलिस कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला होता. भीमा मंडावी यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
 
दरम्यान, गुरुवारी आमदार मंडावी यांचे अस्थिविसर्जन करण्यात आले. त्यानंतर भीमा मंडावी यांच्या पत्नींनी कुटुंबीयांसह गावातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी भीमा मंडावींचे वडील, पत्नी आणि अन्य कुटुंबीयांनीही मतदान केले. दरम्यान, या मतदान केंद्रावर मंडावी यांचे कुटुंबीयच नव्हे तर अन्य ग्रामस्थांनीही नक्षलवाद्यांच्या विरोधाला न जुमानता मतदानाचा हक्क बजावला.