समुद्रस्वच्छतेसाठी रोबोट : भारतीय विद्यार्थाची कामगिरी
   दिनांक :12-Apr-2019
दुबई,
जगात आज सागरी प्रदूषणाची समस्या अक्राळविक्राळ रूप धारण करीत आहे. त्यामुळे भावी पिढीला आपण नेमके काय देणार, असा प्रश्न उपस्थित होतो. असे असताना या समस्येवर नव्या पिढीतील एकानेच त्यावर उपाय शोधून काढला आहे. अबूधाबीत शिकणार्‍या भारतीय विद्यार्थ्याने सागरी जीवन वाचवण्यात मोलाची कामगिरी बजावू शकेल, अशा रोबोटची निर्मिती केली आहे. याशिवाय शेतीसाठी लागणारे श्रम कमी करू शकेल, असा रोबोटदखील या विद्यार्थ्याने तयार केला आहे. अतिशय उष्ण भागात या रोबोटचा वापर करता येऊ शकतो.
 
 
 
दुबईतील जीईएमएस युनायटेड इंडियन स्कूलमध्ये शिकणार्‍या साईनाथ मणिकंदन याने मरिन बोट क्लिनर (एम बोट क्लिनर) नावाने हा रोबोट तयार केला आहे. या रोबोटमुळे सागरी प्रदूषण कमी करण्यास मोठी मदत होऊ शकेल. ‘एम बोटमुळे पाण्यावर तरंगणारे प्लॅस्टिक गोळा करता येईल. एम बोटचा आकार एखाद्या बोटीसारखा आहे. एम बोट रिमोटने कंट्रोल करता येते. यामध्ये दोन बॅटरी आहेत. त्यांच्या मदतीने बोट पुढे सरकते,’ अशी माहिती स्वत: मणिकंदनने दिली.
 
एम बोटमधील चाकाला काठ्या जोडलेल्या आहेत. या काठ्यांच्या माध्यमातून समुद्रावर तरंगणारा कचरा गोळा करता येईल. त्यानंतर तो बास्केटमध्ये टाकला जाईल, अशा शब्दांमध्ये मणिकंदनने एम बोटची कार्यपद्धती समजावून सांगितली. एम बोटमध्ये सोलर पॅनेलचाही वापर करता येऊ शकतो, असेही तो म्हणाला. त्यामुळे समुद्र स्वच्छ करण्यास मदत होईल आणि जैवविविधता टिकून राहील, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.