मोफत वीज, कर्जमाफी हा शेतकर्‍यांच्या समस्येवरील उपाय नाही
   दिनांक :12-Apr-2019
- उपराष्ट्रपती नायडू यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली,
राजकीय नेत्यांनी केवळ लोकप्रियतेच्या बेड्यात अडकून राहू नये, त्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. मोफत वीज आणि कर्जमाफी यासारख्या निर्णयांमुळे शेतकर्‍यांच्या समस्यांवर दीर्घकालीन तोडगा निघू शकणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज शुक्रवारी केले. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये देशभरातील शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याच्या घोषणांचा पाऊसच पाडणे सुरू केले आहे. याच अनुषंगाने उपराष्ट्रपतींची ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
 
 
 
राजकीय पक्ष नागरिकांना मोफत वीज देण्याचे आमिष दाखवत असतात, पण लोकांना मोफत नको, आश्वस्त आणि अखंडित वीज हवी असते. अलीकडील काळात तर कर्जमाफीच्या घोषणांचा पाऊसच पडत आहे, पण शेतकर्‍यांच्या समस्यांवर यामुळे कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो काय, याचा विचार कुणीच करीत नाही. कर्जमाफी हा कोणत्याही समस्येवरील अंतिम उपाय असूच शकत नाही, असे नायडू यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या 125 व्या स्थापनादिनी आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले.
नागरिकांना अतिरिक्त पायाभूत सुविधा कशा मिळतील, त्यांना चांगली बाजारपेठ कशी उपलब्ध होईल, वेळेच्या आत, स्वस्त व्याजदराने शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध कसे होईल, याचा विचार करण्याची गरज आहे. या देशाच्या धोरणकर्त्यांनी दीर्घकालीन उपाय तयार करण्यावर विचार करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. कर्ज मंजूर करताना आणि ते मंजूर झाल्यानंतर बँकांनी अतिशय दक्ष राहायला हवे. या प्रक्रियेत िंकचितही दुर्लक्ष करू नका, असे आवाहन त्यांनी केले.