मसूद अझहरवर बंदी आणण्यासाठी चीनवर दबाव
   दिनांक :12-Apr-2019
- अमेरिका, फ्रान्सने दिला इशारा
नवी दिल्ली,
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी पुन्हा एकदा दबाव वाढत आहे. मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी प्रक्रियेला वेग आला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मसूद अझहरवर बंदी आणण्यासाठी आणलेल्या प्रस्तावावरून अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटेन यांनी चीनला तांत्रिक अडचणी हटविण्यासाठी सांगितले आहे.
 
 
 
अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या तीन देशांनी मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी पािंठबा दिला आहे. सुरक्षा परिषदेत 1267 प्रतिबंध समिती पुढील काही दिवसांत पुन्हा एकदा मसूद अझहरवरील बंदीचा प्रस्ताव आणणार आहे. एकीकडे मसूद अझहरच्या प्रकरणावर चीनसोबत चर्चा केली जात आहे. येत्या 23 एप्रिलपर्यंत चीनने मसूद अझहरवर बंदी आणण्याच्या प्रस्तावातील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, असे या देशांकडून सांगण्यात आले आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या मसूद अझहरचा समावेश काळ्या यादीत करण्यासाठी सुरक्षा परिषदेत पुन्हा प्रस्ताव आणण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मसूद अझहरवर बंदी येऊ शकते. याशिवाय त्याच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई होऊ शकते. मसूदच्या परदेश यात्रांवरदेखील निर्बंध आणले जाऊ शकतात.
महिनाभरापूर्वी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीने दहशतवादी मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला होता. व्हिटो पॉवरचा वापर करुन चीनने मसूदचा प्रस्ताव रोखून धरला होता. त्यावेळी चीनच्या भूमिकेवर अनेकांनी टीका केली होती. मात्र, त्यानंतर चीनने मसूद प्रकरणावर लवकरच तोडगा काढू, या प्रस्तावाला आम्ही विरोध केला नसून आम्ही त्यावर चर्चा करीत आहोत, असे सांगितले होते.
भारतामधील चीनचे राजदूत लुओ झाओहुई यांनी सांगितले होते की, मसूद प्रकरणी चीन लवकर तोडगा काढेल, हे प्रकरण तांत्रिक आहे आणि आम्ही मसूद प्रकरणावर चर्चा करीत आहोत. आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही लवकरच हे प्रकरण सोडवणार आहे. मसूदबाबत भारताकडून व्यक्त होत असलेली िंचता आम्हाला माहिती आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.
संयुक्त राष्ट्र संघात चीनने घेतलेल्या भूमिकेवर भारत, अमेरिकेसह अनेक देशांनी नाराजी दाखवली. चीन जर या प्रकरणावर गंभीरतेने विचार करीत नसेल तर आम्हाला दुसरा पर्याय निवडावा लागेल, असे अमेरिकेने सांगितले होते. त्यामुळे पुन्हा एकदा चीनवर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे चीन काय भूमिका घेते, हे लवकरच दिसून येईल.