प्रत्यार्पणाविरोधात मल्ल्याची नवी याचिका दाखल
   दिनांक :12-Apr-2019
- याच महिन्यात सुनावणी शक्य
लंडन, 12 एप्रिल
भारतातील प्रत्यार्पणाच्या आदेशाला आव्हान देण्याची परवानगी नाकारण्यात आल्यानंतर 9400 कोटींचा कर्जघोटाळा करणारा मद्यसम्राट विजय मल्ल्याने येथील उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली आहे. याच महिन्यात त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
 
 
 
गेल्या शुक्रवारी मल्ल्याने प्रत्यार्पण आदेशाला आव्हान देण्याची परवानगी मागणारा अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला होता. न्या. विल्यम्‌ डेव्हिस यांनी त्याचा अर्ज फेटाळला होता, सोबतच या तोंडी आदेशाला न्यायालयीन कामकाजांच्या पाच दिवसांच्या आत आव्हान देण्याचा पर्यायही न्यायालयाने खुला ठेवला होता. त्यानुसार मल्याने गुरुवारी नव्याने याचिका दाखल केली.
 
या याचिकेवरील सुनावणीत मल्ल्याचे वकील, भारताने सादर केलेल्या पुराव्यांना विरोध करतानाच, मल्ल्याला भारतात कसा धोका आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करतील, तर भारताची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील, मल्ल्याने केलेला कर्जघोटाळा किती मोठा आहे, याचे आणखी पुरावे सादर करतानाच, त्याला भारताच्या स्वाधीन करणे का आवश्यक आहे, यावरही युक्तिवाद करतील, अशी माहिती न्यायालयातील अधिकार्‍यांनी दिली.