पीएम नरेंद्र मोदी चित्रपट: स्थगितीविरुद्ध निर्मात्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
   दिनांक :12-Apr-2019
मुंबई:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगानं दिलेल्या स्थगितीच्या विरोधात चित्रपटाच्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावरील स्थगिती उठवण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर १५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
 

 
अभिनेता विवेक ओबेरॉयची भूमिका असलेला 'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र, निवडणुकीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास मतदार प्रभावित होऊ शकतात, असं म्हणत विरोधकांनी त्यास आक्षेप घेतला होता. तसंच, त्याविरोधात राजकीय पक्षांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने हा निर्णय निवडणूक आयोगावर सोपवला होता. आयोगाने आचारसंहिता भंगाचा मुद्दा पुढे करत चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली. त्यामुळे ११ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
 
 
निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आता निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करून घेतली असून त्यावर १५ एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे.