तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितक्याच जोमाने काम करेल
   दिनांक :12-Apr-2019
- स्मृती इराणींचा कॉंगे्रसवर पलटवार
फोटो पीटीआय
अमेठी, 12 एप्रिल
2014 च्या शपथपत्रात उल्लेख असलेल्या शैक्षणिक दर्जावरून कॉंगे्रसने उडवलेल्या थट्टेला केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी आज सडेतोड उत्तर दिले. गेल्या पाच वर्षांत तुम्ही माझ्यावर शक्य होईल त्या मार्गाने अनेक वार केले, भरपूर शिव्या घातल्या. मी तुम्हाला इतकेच सांगू इच्छितो की, तुम्ही माझा जितका अपमान कराल, तितक्याच तातडीने मी अमेठीत कॉंगे्रसविरोधात काम करणार आहे, असा पलटवार स्मृती इराणी यांनी केला.
 

 
 
अमेठीत यावेळी कॉंगे्रसचा पराभव होणार असल्याची जाणीव तुम्हाला झाली असल्यानेच तुम्ही नको त्या मुद्यावरून मला अपमानित करीत आहात, पण हा माझा नाही, तर अमेठीवासीयांचा अपमान आहे आणि याचे परिणाम तुम्हाला याच निवडणुकीत भोगावे लागणार आहेत, असेही स्मृती इराणी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
 
स्मृती इराणी यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी शपथपत्रात आपण पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केले नसल्याचे नमूद केले आहे. यावरून कॉंग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या टीव्ही मालिकेच्या संकल्पनेवरून स्मृती इराणी यांच्यावर टीका केली. प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, क्वॉलिफिकेशन के भी रूप बदलते हैं, नए-नए सांचे में ढलते हैं, एक डिग्री आती है, एक डिग्री जाती है, बनते अॅफिडेविट नए है,’ सोबतच, आता एक नवीन टीव्ही सिरीयल येणार आहे आणि या सिरियलची ओपिंनग लाईन ‘क्योंकि मंत्री भी कभी ग्रॅज्युएट थी,’ अशी असणार आहे. यानंतर स्मृती इराणी यांनी कॉंगे्रसवर पलटवार केला.