इंटरनेटच्या वापरामुळे...
   दिनांक :12-Apr-2019
 
इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. सोशल नेटवर्किंग किंवा गॅझेट्‌सशिवाय राहणं कठिण झालं आहे. अशा परिस्थितीत इंटरनेटपासून दूर झाल्याने किंवा काही काळ नेटचा वापर न केल्याने हे व्यसन जडलेल्यांना ह्दयाची धडधड वाढणं, रक्तदाब वाढणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात, असं आढळून आलं आहे. इंटरनेटच्या वापराचे दुष्परिणाम याबाबत संशोधन करण्यात आलं. मोबाईल, लॅपटॉपसारख्या उपकरणांवर सतत अवलंबून असणार्‍यांना त्यापासून दूर केल्यावर अस्वस्थता जाणवते, असं याआधी आढळून आलं होतं. पण या मानसिक अवस्थेसोबतच काही शारीरिक बदलही होतात, हे नव्या संशोधनातून समोर आलं.

 
ब्रिटनमधल्या स्वान्सी विद्यापीठात याबाबत संशोधन करण्यात आलं. यात १८ ते ३३ वर्षांच्या १४४ लोकांचा सहभाग होता. इंटरनेटच्या वापराआधी आणि नंतर त्यांच्या हृदयाची गती आणि रक्तदाब मोजण्यात आला. यावेळी त्यांची अस्वस्थता आणि इंटरनेच्या व्यसनाचं परिक्षणही करण्यात आलं. काही लोकांच्या हृदयगतीत आणि रक्तदाबात ३ ते ४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. तर काहींमध्ये हे प्रमाण बरंच जास्त असल्याचं आढळून आलं. या लक्षणांचा संबंध अस्वस्थतेशी जोडला जातो. तसंच हार्मोन्समध्ये काही बदल होतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे इंटरनेटचा अतिवापर करणार्‍यांनी थोडी काळजी घ्यायला हवी.