व्हॉट्स अ‍ॅपवरून पैसेही पाठवता येतील!
   दिनांक :12-Apr-2019
नवी दिल्ली,
भारतात अ‍ॅप बेस्ड पेमेंट व्यवहार झपाट्याने वाढत असल्याने लवकरच गुगल पे, पेएटीएम यांच्यापाठोपाठ व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला पैसे पाठवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. व्हॉट्स अ‍ॅपकडून पेमेंट सुविधेची चाचणीही करुन घेण्यात येणार आहे. काही मर्यादीत युजर्सना Whatsapp Pay ची सुविधा देऊन त्याची चाचणी होईल. भारतात व्हॉट्स अ‍ॅप युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे Whatsapp Pay च्या माध्यमातून कंपनी आर्थिक व्यवहाराच्या स्पर्धेत उतरणार आहे.

 
 
व्हॉट्सअ‍ॅप आता केवळ मेसेजवर बोलण्यापर्यंतच मर्यादित राहणार नाही. पुढील पाच-सहा महिन्यांमध्ये व्हॉट्स अ‍ॅप भारतात Whatsapp Pay लॉन्च करणार आहे. 10 लाख युजर्संना चाचणी स्वरुपात Whatsapp Pay सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अहवालानुसार ही चाचणी भारतात लागू करण्यासाठी त्यांना परवानगी मिळाली आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला आता व्हॉट्स अ‍ॅप पैसेही पाठवता येणार आहेत. व्हॉट्स अ‍ॅपच्या या नव्या फीचरमुळे भारतातील ई-वॉलेट कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(NPCI) ने व्हॉट्सअपला छोटे व्यवहार करण्याच्या अटीवर चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. सध्या भारतात Paytm अ‍ॅप पेमेंटसाठी मोठ्या प्रमाणात लोकांकडून वापरण्यात येतो. मात्र Whatsapp Pay आल्यानंतर Paytm ला मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. त्यासाठी पेटीएमचे संचालक विजय शेखर शर्मा यांनी व्हॉट्स अ‍ॅप पेमेंट सुविधेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. Whatsapp Pay मध्ये व्यवहार करताना कोणतीच सुरक्षा राहू शकत नाही कारण त्यात लॉग इन करण्याची गरज नाही. डेटा लोकलाइजेशन करण्यासाठी आरबीआयकडून घालण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याचं व्हॉट्स अ‍ॅपकडून ग्वाही देण्यात आली आहे. सहा महिन्यांमध्ये ही चाचणी पूर्ण होईल त्यानंतर युजर्सना या सुविधेचा लाभ घेता येईल असं व्हॉट्स अ‍ॅपने सांगितले आहे.
व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नवं पेमेंट फीचर ऑप्शन दिलं जाईल. या पेमेंटवर क्लिक करताच तुम्ही यूपीआय पेजशी जोडले जालं. त्यानंतर युपीआय किंवा बॅंक अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट करता येईल. सध्याच्या घडीला डिजिटल व्यवहारांचा सामान्य नागरिकांपासून श्रीमंतापर्यंत सगळेच जण वापर करताना दिसत असतात. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅपने नव्या बाजारात पाऊल टाकण्याचं ठरवलं आहे.