चैत्र म्हणजे रामराज्याची सुरुवात!
   दिनांक :13-Apr-2019
बबन मोहरील
९७६५८४७८७४
 
असुरशक्तीचे निर्दालन करून प्रभू राम अयोध्येला परतले, तो गुढीपाडव्याचा दिवस. याच दिवसापासून अयोध्येत खर्‍या रामराज्याला सुरुवात झाली. त्याआधी रामाने 14 वर्षांचा संघर्षाचा काळ घालविला तो दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी. तोपर्यंत अयोध्येत रामाच्या नावाने भरताने राज्य चालविले आणि तोही येणार्‍या हजारो वर्षांच्या पिढीसमोर आदर्शच ठरला. कोणत्याही भूमीवर रामराज्य येण्याकरिता त्याआधी त्यागाची परंपरा असलेल्या ईश्वाकू कुळाचाही जन्म व्हावा लागतो. या ईश्वाकू कुळाच्या त्याग, नि:स्वार्थ आणि बलिदानाची परिपूर्णता म्हणजे रामराज्य होय. हजारो वर्षांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेलेल्या या रामराज्याची सुरुवातच गुढीपाडव्याला झाली. म्हणून गुढीपाडवा वर्षाचा केवळ पहिला दिवस होऊ शकत नाही. जगातील सर्व संस्कृतींमध्ये वर्षाचा पहिला दिवस वेगवेगळ्या दिवशी पाळला जातो. पण, भारतवर्षातील वर्षाच्या पहिल्या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
 
 
रामराज्य म्हणजे सुशासन. सत्याच्या मार्गावर चालणारे देशाचे शासक, सर्वोपरी न्यायव्यवस्था, श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सर्वांना समान अधिकार, गरिबांचे कैवारी, चोर, लुटारू, दुष्ट आणि धूर्त लोकांसाठी कर्दनकाळ, नि:स्वार्थ बुद्धीने, निर्मल मनाने, सदैव लोकसेवा करणारे राज्य म्हणजे रामराज्य, अशी पुराणकाळापासून रामराज्याची कल्पना आहे. प्रभू श्रीरामांनी आयोध्येवर अनेक दशकं राज्य केले. रामराज्याची संकल्पना श्रीरामांच्या कार्यशैलीला पाहून साकार झाली. न्यायप्रिय श्रीरामांचे संपूर्ण चरित्र इतके स्वच्छ आहे, म्हणूनच त्यांना इतिहासात पुरुषोत्तम श्रीराम म्हणून संबोधन करण्यात येते. श्रीरामांच्या काळात माणसा-माणसात कोणताच भेद नव्हता. इतकेच काय, तर प्राणीही सुखी होते. पाऊस चांगला पडत असे, त्यामुळे शेतीचे भरपूर उत्पादन व्हायचे, असा उल्लेख पुराणात आहे. याचाच अर्थ रामाच्या राज्यात शेतकर्‍यांकडे विशेषत्वाने लक्ष देण्यात येत असे, असाही होतो. रामराज्यात सर्वच सुखी असतात, याचा अर्थ सर्वांचेच लाड पुरविल्या जातात, असा नाही. पिळवणूक करणार्‍या व्यापार्‍यांना अशा व्यवस्थेत दंडकही असतो. सरकार दरबारी अथवा सरकारच्या अखत्यारित काम करणार्‍या सरकारी अधिकारी, कर्मचार्‍यांच्या ऐतखाऊपणाला येथे थारा नसतो. उत्पादनाला प्रथम स्थान असते आणि श्रमजीवींच्या श्रमाचा सन्मान होत असतो. अगदी हाच अनुभव शिवाजी महाराजांच्या काळात येतो.
 
 
शिवरायांचे रामराज्य
प्रभू श्रीरामानंरतच्या हजारो वर्षांच्या कालखंडात, आपल्या देशात अनेक श्रेष्ठ शासक, प्रशासक अस्तित्वात आले. राजा भोज, राजा विक्रमादित्य, पृथ्वीराज चव्हाण, सम्राट चंद्रगुप्त या सर्वांनी आपल्या देशाला रामराज्य दिले आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. खरे रामराज्य आणण्यात आजच्या काळात गठ्ठा मतांचे राजकारण आड येते. ही सत्ताधार्‍यांची विवशता असली, तरी शिवाजी महाराजांच्या काळात त्यांची याहीपेक्षा मोठी विवशता होती. समाजातील गरिबांची लूट करणारे, त्यांच्यावर अन्याय करणारे जमीनदार, सरंजामदार, छोटे, मोठे संस्थानिक त्याही काळी होते. त्यांना दंड केल्यास त्यांच्याकडून मुसलमानी सत्ताधार्‍यांशी हातमिळवणी होण्याची भीती होती. तरीही त्याला न जुमानता शिवरायांनी आधी राज्यातल्या अशा दुष्ट प्रवृत्तींना दंडित करून सामान्य जनतेचा विश्वास संपादन केला. दुष्टांना दंड दिला आणि प्रामाणिक, दुर्बल व गरिबांना न्याय दिला म्हणूनच ते रयतेचा राजा ठरले. सैन्य लढाईवर पाठविताना रस्त्यात पिकांची नासाडी होऊ नये, अशा सूचना महाराज द्यायचे. शेतकर्‍यांविषयी इतका संवेदनशील शासक रामराज्याचाच शासक असू शकतो.
 
 
महात्मा गांधीना अभिप्रेत लोकशाही 
महात्मा गांधींना अभिप्रेत लोकशाही ही रामराज्याच्या कल्पनेतीलच आहे. रामराज्याची स्थापना हा आदर्श पुढे ठेवूनच महात्मा गांधींच्या नेतृत्वात स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या नेत्यांपासून तर स्वातंत्र्योत्तर काळात निवडणुका लढविणार्‍या नेत्यांपर्यंत प्रत्येकाने राजकारण केले आहे. मात्र, महात्मा गांधी म्हणायचे, रामायण हे खर्‍या लोकशाहीचे उदाहरण आहे. स्वातंत्र्य म्हणजे दुसर्‍या कुण्या पुढारलेल्या शासन व्यवस्थेचे अनुकरण करावे, असा नाही. आपल्याला आपले वाटणारे राज्य हवे आणि मी त्याला रामराज्य म्हणतो. म्हणजेच नागरिकांच्या नैतिकतेवर आधारलेले राज्य. धर्म, शांतता, सौहार्द आणि लहान-मोठे, उच्च-नीच, सर्व प्राणिमात्र आणि पृथ्वीच्यासुद्धा आनंदाचा विचार करून वैश्विक जाणिवेवर आधारलेले राज्य म्हणजेच रामराज्य, अशी महात्मा गांधींची रामराज्याविषयीची व्याख्या होती. देशाच्या विकासाला खेड्यापासून सुरुवात झाली पाहिजे. तळगाळातील जनतेला खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य उपभोगू द्यायचे असेल, तर आधी त्यांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीत सुधारणा व्हायला पाहिजे आणि तेच खरे रामराज्य, असे गांधीजींचे मत होते.
 
रामराज्याची प्रतीक्षा
अजूनही या देशाला रामराज्याची प्रतीक्षा आहे. देशाबाहेरच्या दुष्टांचा नाश व्हावा, ही तर सर्वांचीच अपेक्षा आहे, परंतु त्याचबरोबर देशांतर्गत दुष्ट प्रवृत्तीचा नाश होणे किंवा कमीत कमी त्याला आळा बसावा, अशी व्यवस्था येणे गरजेचे आहे. त्यासाठी सत्ताधार्‍यांच्या मार्गात ज्या काही अडचणी आणि अडथळे आहेत, ते दूर व्हायलाच हवेत. मात्र, रामराज्य येण्यासाठी रामासारखाच शासक असायला हवा. भरतासारखे सत्तेतील सहभागी सहकारी असायला हवे आणि हनुमंतासारखे जिवाला जीव देणारे प्रामाणिक सेवकही असायला हवे. केवळ स्वत:च्या पोळीवर तूप ओढून घेणारे, सेवक असू शकत नाही आणि तोपर्यंत रामराज्यही शक्य नाही.
 
अनुनय कोणाचाच होता कामा नये. अगदी स्वदेशातीलच ऐतखाऊ आणि दलालांचाही मतांच्या गठ्‌ठ्यापायी अनुनय होता कामा नये. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी थोरा-मोठ्यांची मदत न घेता मावळ्यांना स्वबळावर तयार केले होते. प्रभू रामांनीही वानरसेनेची मदत घेऊन असुरांचा नाश केला होता. आज अतिरेक्यांचा मोठा प्रश्न आहे. श्रीरामांच्या आणि शिवरायांच्या काळातही तो होताच. रामायण काळात असुर अदृश्य होऊन लपून हल्ला करायचे आणि ऋषी-मुनींचे यज्ञ उद्ध्वस्त करायचे. त्याला मायावी युद्ध म्हटले जायचे. आजच्या अतिरेक्यांचे हल्ले म्हणजे मायावी युद्धाचा भ्याडपणाच आहे. त्यासाठी सध्याच्या सरकारने चालविलेले ‘सर्जिकल स्ट्राईक’ उत्तमच आहे. त्या काळी असुरांना वठणीवर आणण्यासाठी श्रीरामांनाही सर्जिकल स्ट्राईक घडवून आणावा लागला होता. होय, एकट्या हनुमानाने श्रीलंकेत जाऊन प्रचंड जाळपोळ, तोडफोड केली, तो पहिला सर्जिकल स्ट्राईकच होता. पण, त्यानंतर रावणाशी निर्णायक युद्धही झाले होते. अशा निर्णायक युद्धाचीसुद्धा परिस्थितीनुसार वेळ येणार आहे आणि तशी गरजही आहे. तोपर्यंत येणारा प्रत्येक गुढीपाडवा हा केवळ नव्या वर्षाची सुरुवातच ठरणार आहे.