राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरला ममता सरकारने नाकारली परवानगी
   दिनांक :13-Apr-2019
कोलकाता :
 लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिल ला पार पडले असून  पुढील टप्प्यातील निवडणुकांसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली आहे. यावरुन पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि दार्जिलिंग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शंकर मलाकार यांनी सांगितले की, पोलीस ग्राऊंडवर १४ एप्रिलला राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी याला परवानगी नाकारली आहे. परिणामी राहुल गांधी यांची सिलीगुडी येथील जाहीर सभा रद्द करावी लागली आहे. सिलिगुडीचे पोलीस आयुक्त बी.एल. मीणा यांनीही राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले,' आम्ही त्या ग्राऊंडवर परवानगी नाकरली आहे. काही नियम आहेत, त्यामुळे त्यांना ही परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र, याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नव्हता.'