फ़ुटबाँलपटूने अपंगत्वावर केले मात
   दिनांक :13-Apr-2019
म्यानमार :
 जगभरातील फुटबॉलप्रेमींप्रमाणे म्यानमारचा कौंग खँट लीनलीनही अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीचा चाहता आहे. त्याची तो पूजा करतो, इतर युवकांप्रमाणे आपणही जागतिक स्तरावरील फुटबॉलपटू बनायचे असे लीनचेही स्वप्न आहे.  त्याच्या स्वप्नात अपंगत्वाचा अडथळा आहे. पण, या अडथळ्यामुळे फुटबॉलपटू बनण्याचे स्वप्न पाहायचे त्याने थांबवले नाही. म्यानमारचा लीन हा तंदुरुस्त युवकांनाही लाजवेल असे फुटबॉल खेळतो. १६ वर्षीय हा खेळाडू त्याच्या याच फुटबॉल कौशल्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 
 
 
''फुटबॉल खेळताना एक पाय नसल्याचे मी विसरूनच जातो. सामान्य खेळाडूंप्रमाणेच मी फुटबॉल खेळतो,'' असे लीनने सांगितले. नुकतेच त्याला एका स्थानिक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविले. लहानपणापासूनच लीनला उजवा पाय नाही. पण, त्याने त्याचा बाऊ केला नाही. वयाच्या पाचव्या वर्षी त्याने प्रथम फुटबॉलला किक मारली. त्यावेळी तो लडखळला. पण, आता तो अगदी सहजतेने फुटबॉल खेळतो. ''मला कोणी हरवू शकत नाही, परंतु फ्री किक अडवताना मला अपयश येते कारण माझी उंची कमी आहे,''असे लीन सांगतो.