उत्तर कोरियासोबत तिसर्‍या शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प अनुकूल
   दिनांक :13-Apr-2019
वॉशिंग्टन,
उत्तर कोरियासोबत तिसरी शिखर परिषद घेण्याचा मानस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग-उन यांच्यासोबत आण्विक निर्बंध आणि मानवाधिकार या मुद्यांवर आपण तिसरी परिषद घेण्यास इच्छूक असल्याचे त्यांनी व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
 
 
 
उत्तर कोरियाशी वैर असलेल्या दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून-जे सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर असून, ट्रम्प आणि त्यांची गुरुवारीच भेट झाली. या पृष्ठभूमीवर, ट्रम्प यांनी उत्तर कोरियासोबत परिषद घेण्याचा मानस व्यक्त केला, हे विशेष!
यापूर्वीच्या दोन्ही परिषदा आपण ‘एंजॉय’ केल्याचे यावेळी ट्रम्प म्हणाले. किम जोंग यांच्या सोबतच्या दोन्ही बैठका आनंददायी वातावरणात पार पडल्या होत्या, असे ते म्हणाले.
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग-उन यांच्यातील व्हिएतनामच्या हॅनोईमध्ये झालेली भेट कोणत्याही ठोस कराराशिवायच आटोपली होती. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ही भेट झाली होती. उत्तर कोरियावर असलेले निर्बंध पूर्णत: उठविण्यात यावे, अशी किम जोंग यांची मागणी होती. ही मागणी अमेरिकेने धुडकावून लावली होती. हे आम्ही करू शकत नाही, असे या परिषदेनंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले होते.
 
यापूर्वी िंसगापूर येथे झालेल्या परिषदेमध्ये फारसे काही साध्य झाले नसल्याची टीका झाली होती. त्यामुळे हॅनोई येथील परिषदेमध्ये अण्वस्त्रमुक्तीचा करार होण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प दबाव आणतील, अशीही चर्चा होती. निर्बंध मागे घेण्यासाठी उत्तर कोरियाने आपल्याकडच्या सर्व अण्वस्त्रांचा त्याग करावा, अशी भूमिका अमेरिकेने पूर्वीच घेतली होती.