खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञांची केंद्रात थेट नियुक्ती
   दिनांक :13-Apr-2019
 
 
 
मुंबई: खाजगी क्षेत्रातल्या नऊ तज्ज्ञांची थेट केंद्रातल्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये संयुक्त सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे सचिव होण्यासाठी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. मात्र, जलद आणि पारदर्शक कारभार व्हावा, या हेतूने नऊ जणांची मोदी सरकारने थेट निवड केली आहे.
 

 
 
यामध्ये अमर दुबे (नागरी उड्डयण), अरुण गोयल (वाणिज्य), राजीव सक्सेना (आर्थिक मुद्दे ), सुजीतकुमार बाजपेयी (पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन), सौरभ मिश्रा (वित्तीय सेवा), दिनेश दयानंद जगदाळे (अपारंपरिक ऊर्जा ), सुमनप्रसाद सिंह (रस्ते आणि परिवहन मंत्रालय), भूषण कुमार (जहाजरानी) आणि कोकोली घोष (कृषी आणि शेतकरी कल्याण) यांची संबंधित खात्यांमध्ये संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
यासाठी आलेल्या ६ हजार ७७ अर्जांपैकी ८९ जणांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. यानंतर त्यांना पुढील प्रक्रियेसाठी विस्तृत अर्ज भरायला सांगितले होते.
केंद्रात संयुक्त सचिवपदी खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञांची तीन वर्षांसाठी निवड करण्याचा निर्णय सरकारने मागील वर्षी जाहीर केला होता. त्याबाबत एक अधिसूचनाही जाहीर करण्यात आली होती. युपीएससीची परीक्षा न देताही सरकारी अधिकारी होता येणार असल्याने यावर अनेक मतभेद झाले होते.