पाकिस्तानने अतिरेक्यांची ठिकाणे नष्ट केली नाही; माजी राजदूत हक्कानी यांचा दावा
   दिनांक :13-Apr-2019
वॉशिंग्टन: 
 पाकिस्तानने त्यांच्या भूमीतील अतिरेक्यांची ठिकाणे अद्याप नष्ट केलेली नाही. फायनान्शिल अॅक्शन टास्क फोर्स आपल्याला आता काळ्या यादीत टाकेल, केवळ या भीतीने हा देश कारवाईचा देखावा करीत आहे. दहशतवाद हे पाकिस्तानचे धोरण होते आणि आजही ते कायम आहे, असा दावा पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत हुसैन हक्कानी यांनी केला आहे.
 
 
 
पुलवामा हल्ल्यानंतर आलेल्या जागतिक दबावाला बळी पडून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, आपले सरकार पाकिस्तानच्या भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर होऊ देणार नाही, तसेच पाकिस्तानच्या आश्रयात असलेल्या दहशतवादी गटांविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
 
वॉशिंग्टन येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना हक्कानी म्हणाले की, इम्रान खान सरकारने किंवा लष्कराने त्यांच्या भूमीतील दहशतवाद गटांविरोधात कारवाई केल्याचा एकही पुरावा उपलब्ध नाही. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून हवाई हल्ला केला आणि या देशावर जागतिक दबावही वाढला. फायनान्शियल टास्क फोर्सच्या पथकाने पाकिस्तानचा दौरा करून, दहतवादविरोधी कारवाईचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या जागतिक गटाने पाकिस्तानच्या एकूणच कारवाईवर असमाधान व्यक्त करून, काळ्या यादीत टाकण्याची धमकी दिल्यानंतर, पाकिस्तान सरकारने कारवाईचा देखावा निर्माण केला, पण प्रत्यक्षात या देशाने अतिरेकी गटांविरोधात अजूनही ठोस कारवाई केलेली नाही, असा आरोप हक्कानी यांनी केला.
 
जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हक्कानी नेटवर्क यासारख्या दहशतवादी गटांना पाकिस्तानच्या भूमीत अजूनही आश्रय दिला जात आहे आणि त्यांच्या  सुरक्षेची काळजीही घेतली जात आहे. गेल्या ३० वर्षांपासून पाकिस्तानने दहशतवादाला आपले परराष्ट्र धोरण बनविले आहे आणि ते अजूनही कायम आहे, असा दावाही त्यांनी केला.