जालियनवाला बाग हत्याकांड : वैशाखातील वणवा!
   दिनांक :13-Apr-2019
 
 दिनविशेष 
 
प्रवीण भागडीकर  
 
13 एप्रिल 1919 रोजी, बैसाखी सणाला ब्रिटिशांनी जालियनवाला बाग येथे नि:शस्त्र समुदायावर गोळीबार करून 379 जणांना क्रूरपणे मारले (ब्रिटिश शासनाच्या अहवालातील हा आकडा असून, भारतीय कॉंग्रेसने नेमलेल्या समितीने हा आकडा हजारापेक्षा अधिक सांगितला). भारतीय इतिहासातील ‘नृशंस हत्याकांड’ म्हणून याचा उल्लेख केला गेला. अगदी पंतप्रधान चर्चिल यांनीसुद्धा त्यावेळेस या घटनेचा निषेध केला. या घटनेमुळेच गांधीजींच्या असहकार व एकूणच चळवळीला जागतिक प्रतिसाद प्राप्त झाला. शीख नववर्षाच्या प्रारंभी घडलेल्या या नृशंस हत्यांकाडाने केवळ पंजाब नव्हे, तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीला वेगळी दिशा देण्यास बाध्य केले. किंबहुना भारतीयांच्या मनात आता केवळ ‘स्वतंत्र भारत’ ही धारण निर्माण करण्यास ही घटना कारणीभूत ठरली.
 
ज्या वेळेस ब्रिटिश साम्राज्याचा प्रारंभ भारतात झाला त्यावेळेस ब्रिटिशांनी, संसदेत आमचे भारतातील अस्तित्व केवळ भारतीयांना जबाबदार व उत्तरदायी शासनासाठी तयार करण्यासाठीच होय व त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही दिली. ब्रिटिशांचे भारताप्रती धोरण याच दृष्टिकोनातून असेल, असे आपल्या प्रसिद्ध अशा ऑगस्ट 1917 च्या जाहीरनाम्यातून दिले. भारतीयांनीसुद्धा त्याचे स्वागत केले. पण, 1917 मधील जाहीरनामा व 1919 मधील जालियनवाला बाग येथे केलेले हत्याकांड याने ब्रिटिशांच्या भारताप्रती असलेल्या धोरणातील विसंगती जगासमोर आणल्या.
ब्रिटिशांनी संपूर्ण जगभरात स्वत:बाबत व इतर जगाबाबत एक प्रतिमा निर्माण केली. ज्या अंतर्गत ब्रिटिश साम्राज्यासाठी वसाहती असणे अत्यंत गरजेचे होय. लोकशाही व साम्राज्यवादाच्या सहअस्तित्वाची संकल्पना ब्रिटिशांच्या मनात व डोक्यात रुळलेली होती. ‘व्हाईट मॅन बर्डन’ ही मानसिकता या दोन्ही संकल्पनांचा मिलाफ होय. या संकल्पनेनुसार संपूर्ण जगात लोकशाही व उदारमतवादाचा प्रसार करण्यासाठी साम्राज्यवादी वृत्ती असणे गरजेचे होय. त्यामुळे एकीकडे ऑगस्ट जाहीरनामा हा लोकशाही व उदारमतवादाचे प्रतिनिधित्व करतो, तर जालियनवाला बाग हत्यांकाड हा साम्राज्यवादाचे प्रतीक होय. त्यामुळे रौलेट कायद्याच्या आड ज्या ‘कायद्याच्या राज्याची’ संकल्पना ब्रिटिशांनी आणली, त्याच कायद्याच्या राज्याचे अतिशय भयानक रूप म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड होय!
 
 
 
जालियनवाला बाग प्रकरणाचा दुसरा पैलू हा अत्यंत महत्त्वाचा वाटतो. स्वत:ला उदारमतवादी व लोकशाहीवादी म्हणणार्‍या ब्रिटिशांकडून इतका भयानक नरसंहार कसा झाला? याचे कारण म्हणजे पंजाब प्रांत हा ब्रिटिशांसाठी वसाहतवादाचे आदर्श रूप होते. 1857 च्या स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धाला नेस्तनाबूत करणार्‍या ब्रिटिशांच्या लष्करातील मोठा भाग पंजाबातील लष्कराने व्यापलेला होता. ब्रिटिश भारतीय वसाहतवादाचे हृदयस्थान म्हणून पंजाबचे महत्त्व होते. जालियनवाला बाग प्रकरण हृदयस्थानाला हलविणारे होते, जे ब्रिटिशांना मान्य नव्हते. भारतातील इतर कोणत्याही भागामध्ये असंतोष निर्माण झाल्यास त्यापासून ब्रिटिशांना सुरक्षित ठेवण्याचे कार्य हा प्रांत करेल, अशी खात्री व विश्वास त्यांना होता. ब्रिटिश साम्राज्याचा चेहरा या अर्थाने त्यांनी पंजाब प्रांताला महत्त्व दिले. असा पंजाब गांधीजींच्या हाकेला प्रतिसाद देतो, ही कल्पनाच ब्रिटिशांना मान्य नव्हती. जालियनवाला बाग हत्याकांड ब्रिटिशांच्या नीच मानसिकतेचे प्रतििंबब होते. जनरल डायरसारखी व्यक्ती ही केवळ निमित्तमात्र होती. त्यांची अगतिकता, असुरक्षितता इतकी वाढली की, बैसाखीचा सण असूनही त्यांनी हत्याकांड केले व असे करताना त्यांनी केवळ पंजाब अथवा संपूर्ण भारतालाच नव्हे, तर सैन्यात असलेल्या पंजाबी लष्कराला एकप्रकारे संदेश दिला.
 
जालियनवाला बाग व त्यापूर्वी संपूर्ण पंजाबमध्ये ब्रिटिशांविरुद्ध जो रोष होता त्याचे नेतृत्व करणार्‍या डॉ. किश्तलू व डॉ. सत्यपाल यांना ब्रिटिशांनी अटक केली. परिणामी, आंदोलन नेतृत्वहीन झाले. गांधीजींनी घोषित केलेल्या आंदोलनाचा सगळ्यात जास्त प्रभाव पंजाबमध्ये होता. ब्रिटिशांची अस्वस्थता व संशय वाढविण्यात पंजाबमधील परिस्थिती पूरक ठरली. ज्या पंजाबला त्यांनी आपल्या वसाहतवादाचे हृदयस्थान मानले, तो पंजाबच एका मोठ्या षडयंत्राचे केंद्रस्थान बनत आहे, हे त्यांना सहन झाले नाही. हंटर आयोगासमोर जनरल डायरने, जालियनवाला बाग हत्याकांडाचा जो कबुलीजवाब दिला तो या अस्वस्थतेचा पुरावा होय. त्यातच बैसाखीसारखा दिवस निवडणे हा केवळ योगायोग नाही, तर जाणूनबुजून संस्कृतीला दिलेले आव्हान होते. पण नियतीचा खेळ पाहा, ज्या जालियनवाला बागेत हत्याकांड घडले त्यावेळेस तिथे असलेल्या व नशिबाने वाचलेल्या व्यक्तीने तब्बल 20 वर्षांनंतर जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूत्रधार व पंजाबचा ले. जनरल ओडवायर याचा लंडनमध्ये जाऊन मुडदा पाडला व हत्याकांडाचा बदला घेतला. त्या व्यक्तीचे नाव होते- उधमिंसग!
 
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील जालियनवाला बाग हत्याकांड ही केवळ घटना नसून, तत्कालीन भारतीय मानसिकतेला छेद देणारी होती. जालियनवाला बाग हत्याकांडापूर्वी ब्रिटिश राजकारणाच्या दोन विरोधी छटा होत्या. नुकताच उदयास आलेला मध्यमवर्गीय वर्ग जो फक्त मोठ्या शहरांपुरताच मर्यादित होता तसेच स्वत:ला उदारमतवादी, कायदेपंडित व अिंहसावादी मानत होता. याविरुद्ध असा वर्ग जो शेतकरी, कलावंत, मजूर, कामगार असा होता तसेच प्रतिक्रियावादी व हिंसक होता. हत्याकांडापूर्वी या दोन्ही वर्गाने आपली ओळख व अस्तित्व समांतर रीत्या कायम राखले. ब्रिटिशांचा या दोन्ही वर्गांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत सहज होता, त्यामुळे दोन्ही वर्गाला स्वतंत्रपणे हाताळण्यात ब्रिटिश अपयशी ठरले. नेमकी ही बाब गांधीजींच्या लक्षात आली व त्यांनी या दोन्ही वर्गाला साम्राज्यविरोधी राजकारणात आणून अिंहसावादी गट तयार केला. वर्गीय व जातीय बंधनाला शिथिल करून दोन्ही वर्गाला राष्ट्रीय राजकारणाच्या आकृतिबंधात समाविष्ट करण्याचे महत्त्वाचे कार्य गांधीजींनी केले. इतर झालेल्या घटनांपेक्षाही जालियनवाला बाग प्रकरण राष्ट्रीय राजकारणाला अशा ध्रुवीकरणापासून परावृत्त करणारे ठरले. हत्याकांडाची प्रतिक्रिया संपूर्ण भारतभर होती, याचे कारण वरील दोन्ही वर्गांचे या कारणाने झालेले एकीकरण. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीचे खर्‍या अर्थाने भारतीयीकरण झाले ते याच घटनेमुळे. एव्हाना एखाद्या हत्याकांडानंतरच आमची राष्ट्रीयता जागृत होण्याची परंपरा ही पूर्वीपासूनच आहे, याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर आम्हाला आलाच!
 
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर एकीकडे ब्रिटिश साम्राज्यवाद, तर दुसरीकडे भारतीय राष्ट्रवाद अशी सरळ उभी रेष ब्रिटिश भारतात दिसून आली. यामुळे भारतात ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध अतिशय सक्षम अशी चळवळ उभारता आली. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा खर्‍या अर्थाने प्रारंभिंबदू म्हणून जालियनवाला हत्याकांडाचा उल्लेख करता येईल.
जालियनवाला बाग हत्याकांडाने अनेक महत्त्वपूर्ण बाबी राजकारणाच्या पटलावर नोंदविल्या. त्यातील पहिली बाब म्हणजे, अशी राज्यव्यवस्था जी लोकांच्या आशा व आकांक्षांचे प्रतिनिधित्व करते, अधिमान्यता प्राप्त करण्यात यशस्वी होते. भारतातील ब्रिटिश राज्य हे अलिप्त व अप्रातिनिधिक होते. ब्रिटिशांचा तथाकथित लोकशाहीवादी व उदारमतवादी चेहरा लोकांचे अंतरंग जाणण्यास अपयशी ठरला व कोणतेही आव्हान व धोक्याबाबत वाजवीपेक्षा जास्त प्रतिक्रियावादी होत गेले. त्यातूनच जालियनवाला बागसारख्या घटना घडल्या. हत्याकांडापूर्वी जी अधिमान्यता ब्रिटिशांना भारतात प्राप्त होती ती एका झटक्यात नाहीशी झाली व ती अधिमान्यता भारतीय राष्ट्रवादाला प्राप्त झाली. जालियनवाला बाग प्रकरण प्रत्येक शासक व
राज्यव्यवस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण धडा होय. मग ते शासन लोकशाहीवादी असो की एकाधिकारशाही. जालियनवाला हत्याकांड भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला अधिमान्यता प्राप्त करून देणारे ठरले. त्यामुळे तो खर्‍या अर्थाने प्रारंभिंबदू ठरला. 13 एप्रिल 1919 रोजी पेटलेल्या वैशाखातील या वणव्याने अख्ख्या ब्रिटिश साम्राज्याला आपल्या कवेत घेतले व 1947 च्या श्रावणातील स्वातंत्र्याच्या सरींनीच स्वत:ला शांत केले!
9420250243