मोदी हे राजकीय असहिष्णुतेचे सर्वांत मोठे बळी; मुख्तार अब्बास नकवी यांचा दावा
   दिनांक :13-Apr-2019
नवी दिल्ली: 
 
देशात असहिष्णुता आहे, असा आरोप केला जातो आणि असहिष्णुतेच्या नावाखाली पुरस्कार वापसीपासून अनेक नाटक केली जातात, पण सत्यता अशी आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकीय असहिष्णुतेचे सर्वांत मोठे शिकार आहेत, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी आज शनिवारी केला.

 
 
चित्रपट सृष्टीतील काही लोकांनी, या लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला सरकारला पराभूत करण्याचे आवाहन करणारे निवेदन जारी केले. याच अनुषंगाने नकवी यांनी, या तथाकथित सहिष्णुतावाद्यांवर हल्ला चढविला.
पत्रकारांशी बोलताना नकवी म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी, अर्थात्‌च २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात देशातील काही तथाकथित बुद्धिजीवींनी अमेरिका आणि युरोपियन युनियनला नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पत्र लिहिले होते. इतकेच नव्हे, तर कॉंगे‘सच्या काही नेत्यांनी पाकिस्तानात जाऊन, मोदी यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी मदत मागितली होती. मोदी यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर, स्वत:ला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणार्‍या काही लोकांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून, देशातील लोकशाही आणि राज्य घटना धोक्यात असल्याचा आणि मोदी सरकारच्या काळात असहिष्णुता वाढली असल्याचा आरोप केला होता. इतके सारे कट रचल्या गेल्यानंतरही देशातील जनतेचा मोदी यांच्यावरील विश्वास कमी न होता, तो वाढतच गेला. इतका नकारात्मक प्रचार होत असतानाही मोदी यांनी देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले.