तुम्ही केलेल्या अन्यायाला आधी ‘न्याय’ द्या; पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसवर पलटवार
   दिनांक :13-Apr-2019
थेनी:
 १९८४ मधील शीखसंहार, दलितांवरील अत्याचार आणि भोपाळ विषारी वायूकांडातील पीडितांना इतक्या वर्षानंतरही न्याय मिळालेला नाही आणि आता निवडणुकीच्या काळात न्यायाची भाषा करीत आहात. तुम्ही आजवर जो अन्याय केला, त्यांना आधी न्याय द्या, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी काँग्रेसवर पलटवार केला.
 
 
 
काँग्रेस आणि बेईमानी हे दोघेही परस्परांचे चांगले मित्र आहेत, पण कधी कधी चुकीने का होईना, ते दोघेही खरे बोलून जातात. कॉंगे‘स आता म्हणतो की, ‘अब न्याय होगा’. इच्छा नसतानाही या पक्षाने, आपल्या ६० वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या अन्यायाची कबुलीच दिलेली आहे. मी या पक्षाला इतकेच विचारू इच्छितो की, शीखसंहारातील पीडितांना न्याय कोण देणार, हिंसाचारपीडित  दलितांना न्याय केव्हा मिळणार आणि भोपाळ विषारी वायूकांडातील पीडितांना तुम्ही केव्हा न्याय देणार. नेहरू-गांधी घराण्याला एम. जी. रामचंद्रन आणि त्यांच्या सरकारमधील काही नेते आवडत नव्हते, म्हणून काँग्रेसने त्यांचे सरकार बरखास्त केले होते, त्यांना न्याय आजवर मिळालाच नाही, असा घणाघाती हल्ला पंतप्रधानांनी तामिळनाडूच्या थेनी येथे आयोजित विशाल जाहीर सभेत चढविला.
 
 
 
यावेळी पंतप्रधानांनी द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांच्यावरही हल्ला चढविला. स्टॅलिन यांनी पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींच्या नावाला पाठिंबा दिला; मात्र त्यांच्या या भूमिकेला आणि राहुल गांधींना महाआघाडीतील इतर सर्वच राजकीय पक्षांचा विरोध आहे. महाआघाडीतील सर्वच नेते पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहात आहेत, असे मोदी यांनी सांगितले.
 
 
 
पंतप्रधान मोदी यांनी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या शताब्दीवर्षानिमित्त श्रद्धांजली अर्पण केली, तसेच दिवंगत नेते एमजीआर आणि जयललिता यांनाही श्रद्धांजली वाहिली. देशाला अशा नेत्यांवर गर्व आहे, ज्यांनी गरिबांसाठी काम केले, असे पंतप्रधान म्हणाले.