विरोधकांचा विस्तारित अजेंडा
   दिनांक :13-Apr-2019
 
ही तो रश्रींची इच्छा!
 
र. श्री. फडनाईक 
 
 
 हरीपूरच्या हर्‍याने, हरप्रयत्नाने मिळविलेली चपराशाची नोकरी सुटल्यानंतर, कुठे काहीच न जमल्याने राजकारण जवळ केले! तो त्याच्या गल्लीतला लीडर झाला! राजकारणाचा त्याचा अभ्यास मात्र दांडगा! राजकीय भाकीत करण्यात त्याचा हात, या क्षेत्रातले जाणते राजे सुद्धा धरू शकत नाहीत. त्यामुळे हर्‍याने हल्ली केलेले भाकीत हसण्यावर नेण्यासारखे नाही; त्याची दखल गांभीर्यानेच घ्यावी लागेल!
 
 
 
हर्‍या म्हणाला : गेल्या पाच वर्षांत केलेल्या ज्या कामांचा ढिंढोरा पिटला जात आहे, त्याचे श्रेय पंतप्रधानांना, त्यांच्या मंत्र्यांना, त्या सरकारला मुळीच नाही, हा प्रमुख विरोधी पक्षाचा शोध चुकीचा नाही; तो रॉबर्टशोध नाही! तो पक्ष आणि त्या माळेतले लहान-सहान मणी यांनी आपआपल्या जाहीरनाम्यांत, भाषणांत, पत्रपरिषदांमध्ये या गोष्टीवर आता नव्या प्रकारे भर देण्याचे ठरविले आहे. काही पक्षांनी तर आपल्या जाहीरनाम्यांना, दुसर्‍या टप्प्यातील मतदानापूर्वी पूरक-पत्रे जोडण्याचेही ठरविले आहे. हर्‍याच्या भाकीतानुसार त्याचा गोषवारा खालीलप्रमाणे असेल :-
‘‘पंतप्रधानांनी जनधन योजनेअंतर्गत 34 कोटी 43 लाख गरीब कुटुंबांची बँक खाती उघडली याचे श्रेय स्वत:कडे घेऊ नये. ती खाती बँकांच्या कारकुनांनी उघडली आहेत. त्यांनीच पासबुके तयार केलीत, खातेदारांची छायाचित्रे त्यांना डकविली. या कारकुनांच्या कामगिरीवर व मेहनतीवर पंतप्रधानांनी डाका मारू नये!’’
‘‘पंतप्रधान आणि त्यांचे ते एनडीए सरकार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1 कोटी 53 लाख घरांची निर्मिती केल्याचे ते सांगतात. परंतु हे साफ खोटे आहे. ही घरे गावगावच्या अभियंत्यांनी, गवंड्यांनी बांधली. मजुरांनी विटा आणि सिमेंट-रेतीचा मसाला गवंड्याजवळ नेऊन दिला. त्यांनी 1.53 कोटी घरांची बांधणी केली; एनडीए सरकारने नाही.’’
‘‘आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील 10 कोटी परिवारांना सरकारने मोफत उपचाराची सोय उपलब्ध करवून दिली, असा दावा करणारे हे सरकार आणि त्यांचा सरदार अत्यंत खोटारडे आहेत. ही सोय जागोजागीच्या डॉक्टरांनी, परिचारिकांनी आणि कंपाऊंडरांनी केली आहे! सरकारने फुकटचे श्रेय घेऊ नये. पंतप्रधानांना सिरींज तरी धरता येते का? मेडिकलचे शिक्षण त्यांनी कुठे घेतले, हे त्यांनी आधी सांगावे!’’
‘‘सौभाग्य योजनेअतर्ंगत गरिबांना मोफत वीज-जोडणी करून दिल्याचा सरकारचा दावा कमालीचा खोटा आहे. पंतप्रधानांनी कधी केला वायरमनचा कोर्स? त्यांनी साधा टेस्टर तरी कधी हाती घेतला आहे का? ज्याप्रमाणे त्यांनी कधीही बंदूक हाती धरली नाही, त्याप्रमाणेच त्यांनी किटकॅटमध्ये कधी फ्यूज वायर बसविला नाही! असे असताना ते वीज-जोडणीचा दावा करतात, हा खोटारडेपणाचा कळस आहे!’’
‘‘त्यांचे एक मंत्री नितीन गडकरी, देशभरातून शेकडो रस्ते बांधल्याची शेखी मिरवतात. गडकरी सिव्हिल इंजिनीअर आहेत का? त्यांनी फावडे, कुदळीचा वापर जीवनात एकदा तरी केला आहे का? (याउलट, आमच्या मोळीतील प्रत्येक पक्ष कसा आपल्या मित्र-पक्षांची कबर खोदण्यासाठी ही अवजारे घेऊन सदैव सज्ज असतो आणि त्याचा नित्य-नेमाने वापर करतो! (सूचना : हे सत्यकथन फक्त मनातल्या मनात म्हणायचे. आमच्यापैकी काही गोंधळलेले पुढारी ते जाहीरपणे व्यक्त करतील, ही भीती आहे; म्हणून ही सूचना)). तर रस्ते बांधण्याचे श्रेय बांधकाम अभियंत्यांना, कुदळी हाणणार्‍या मजुरांना, आणि प्रामुख्याने बूल-डोझरला आहे! त्या अजस्त्र यंत्रामुळेच हे रस्ते एवढे मजबूत आणि गुळगुळीत झाले आहेत. तसेही गडकरी बुलडोझरचा वापर ‘वार्निंग देण्यासाठी’ करत असतात. मात्र श्रेय स्वत: लाटतात. खोटारडेपणाचे हे आणखी उदाहरण!’’
‘‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देशातील सुमारे 7 कोटी गरीब कुटुंबांच्या घरी आम्ही गॅस सिलेंडर पोहचविण्याची सोय केली, अशी प्रौढी हे मोदी सरकार मिरवते. मात्र हे काम डिलीव्हरीबॉय करतो, हे तुम्हा-आम्हा सर्वांना माहीत आहे. या गरीब मुलाच्या कष्टाचे श्रेय सुद्धा स्वत:कडे खेचण्याची या सरकारची नीती िंनदनीय नाही का, हा आमचा प्रश्न आहे.’’
‘‘मतदारांनो! विकासाचे धनी हे सरकार नाहीच नाही. हेही लक्षात घ्या, की 55 वर्षे आम्ही हा देश अविकसित ठेवला नसता, तर यांना विकासाला वाव तरी मिळाला असता का!’’
हर्‍या पुढे म्हणतो, फक्त 91 मतदारसंघांत मतदान झाले आहे. उर्वरित जागांसाठी तथाकथित महामोळीचा आता हाच अजेंडा राहणार आहे : हे सरकार खोटारडे आहे! याची विकासाची कास केवळ आभास आहे! आमच्यापाशी सांगण्यासारखे फक्त एवढेच बाकी राहिले आहे!
या सर्व कर्तबगार कारागीरांचा सदुपयोग करून न घेणार्‍या, लागोपाठ दहा वर्षे सत्तेवर असणार्‍या यापूर्वीच्या सरकारला ढप्पस म्हणायचे का, हे आता जनतेनेच ठरवायचे!