सारा अली खान उतरणार राजकारणात
   दिनांक :13-Apr-2019

सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी अभिनेत्री सारा आली खानने गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पदार्पण करताच साराचे लाखो चाहते झाले आहे. त्या पाठोपाठच सारा रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटात दिसली होती. तिचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले होते. या चित्रपटानंतर तिची लोकप्रियता वाढली होती. तेव्हा पासून या ना त्या कारणाने सारा चर्चेत येत असते. आता साराने तिला राजकारणात उतरायला आवडेल हे वक्तव्य करुन सर्वांचे लक्ष वेधले आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर साराने केलेल्या या वक्तव्याला विशेष महत्व देण्यात आले आहे.

 

 
 

काही दिवसांपूर्वी सारा अली खानची मुलाखत घेण्यात आली होती. त्या मुलाखतीमध्ये साराने सांगितले की, ‘एक यशस्वी अभिनेत्री झाल्यानंतर मला राजकारणात उतरायला आवडेल. पण अभिनयाला माझे पहिले प्राधान्य असेल’ असे सारा म्हणाली. साराने कोलंबिया विद्यापीठातून इतिहास व राज्यशास्त्र विषयाची पदवी घेतली असल्याने तिला राजकारणात रुची आहे हे देखील साराने सांगितले.

  

अभिनेत्री करिना कपूर खान, साराची सावत्र आई भोपाळमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेला काही दिवसांपूर्वी सुरू होत्या. तसेच कॉंग्रेसने करिनाला तशी ऑफर दिली असल्याचीही चर्चा होती. मात्र करिनाने या सगळ्या चर्चा खोट्या असल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम लावला होता. सध्या सारा दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात सारा सह कार्तिक आर्यन देखील दिसणार आहे. तसेच हा चित्रपट ‘लव आज काल’ या चित्रपटाच्या सीक्वेल असणार आहे आणि या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीमध्ये सुरू आहे. तसेच ‘कुली नंबर १’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये देखील सारा झळकणार आहे.