कश्मीर हमारा है...
   दिनांक :13-Apr-2019
 शुभ बोल रे...
 
 
विनोद देशमुख
9850587622 
 
 
 
या नावाचा एक खेळ आम्ही लहानपणी संघाच्या शाखेत खेळत असू. मैदानात जमिनीवर अखंड भारताचा मोठा नकाशा काढायचा. भारत आणि पाकिस्तान असे दोन गट करायचे. त्या नकाशावरच दंडयुद्ध वगैरे होऊन शेवटी काश्मीर भागावर भगवा झेंडा फडकवायचा आणि सर्वांनी एकसुरात नारा द्यायचा- काश्मीर हमारा है...!
 
 
 
हा बाल-तरुण मुलांचा एक खेळ असला तरी त्यातून राष्ट्रप्रेमाचे प्रशिक्षण दिले जात होते, ही गोष्ट संघाचे आंधळे विरोधक तरी अमान्य करू शकतात काय? हे एकीकडे आणि दुसरीकडे, राजकीय स्वार्थासाठी काश्मिरी फुटिरतावाद्यांचे सतत लांगूलचालन करणारे भारतीय राज्यकर्ते! लांगूलचालन किती, तर शेकडो तरुण दगडफेक करीत असतानाही त्यांच्यावर गोळीबार करायचा नाही. एखाद्या भागातून लष्करी जवान जात असताना शेंबडी काश्मिरी पोरेही त्यांची छेड काढत आहेत. पण त्यांना कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. हातात रायफल असूनही ते मार खात आहेत, यापेक्षा केविलवाणे दृश्य कोणते असू शकते! पण, असे वारंवार घडत आहे आणि तरीही काश्मिरी नेते आणि लोक यांचे लाड सुरूच आहेत! फारूक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्यासारखे नेते सर्व सोयीसवलती उपभोगून पुन्हा आपल्यालाच चावा घेत आहेत.
 
काश्मीरचे नाव काढले की, बहुतांश पुरोगाम्यांना मुस्लिमांचा पुळका येतो आणि त्यांच्या मानवतावादी अधिकारासाठी ते पुढे सरसावतात. (काश्मिरी पंडितांबद्दल मात्र ते चकार शब्द उच्चारत नाहीत) परंतु ते हे विसरतात की, काश्मीरचा प्रश्न हा िंहदू-मुस्लिम नाही. देशाच्या अस्मितेचा हा मुद्दा आहे. सध्याच्या पाकव्याप्त (गुलाम) काश्मीरसह संपूर्ण काश्मीर (खोरे, जम्मू आणि लद्दाख) भारताचे आहे, असा आपल्या संसदेचा एकमुखी ठराव आहे. तो अमलात आणण्यासाठी सर्व भारतीयांनी एकदिलाने प्रयत्न करणे, त्या प्रयत्नांना नैतिक समर्थन देणे हे आपले कर्तव्य आहे. ते पार पाडण्याऐवजी कॉंग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष जेव्हा 370 आणि 35-ए कलमांबाबत बोटचेपी भूमिका घेतो, तेव्हा वाईट वाटते.
या 370 आणि 35-ए मुळे काश्मीर खोरे आज नावालाच आपल्या ताब्यात आहे. लष्करामुळे आपला फक्त भौतिक ताबा आहे. अन्यथा, तेथील बहुसंख्य पाकिस्तानवादी नागरिक आणि अतिरेकी हे सारेच जण भारताचे खाऊन शत्रूचे गुणगान करीत आहेत. आपण त्यांना अक्षरश: फुकट पोसत आहोत. हे कधीतरी थांबले पाहिजे की नाही? देशभर लागू असलेले भारतीय संविधान काश्मीरमध्ये गेली सत्तर वर्षे निष्प्रभ ठरविले जात आहे. उर्वरित देशात संविधान बचाव म्हणत गेली चार-पाच वर्षे सरकारविरुद्ध प्रचार करणारे संविधानप्रेमी यासंदर्भात चकार शब्दही बोलताना दिसत नाही. हा दुटप्पीपणा का, याचे उत्तर देशवासी आज ना उद्या मागितल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी काश्मीर आपले आहे आणि आपलेच राहिले पाहिजे.