फेक न्यूजच्या नियंत्रणासाठी सायबर सुरक्षा
   दिनांक :14-Apr-2019
 
 
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियावर केला जाणारा प्रचार सर्वांत आघाडीवर आहे. प्रत्येक राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून विरोधकांविरुद्ध फेक न्यूज व खोडसाळ घटना पसरविल्या जात आहेत. अशा बातम्यांना प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभागाने पुढाकार घेतला आहे. सोशल मीडियाच्या प्रचाराबाबत जागृतीसाठी सायबर पोलिसांनी सायबर सुरक्षा ही मार्गदर्शक पुस्तिका बनविली आहे.
 
 
 
या पुस्तिकेत निवडणूकविषयक माहितीची सुरक्षितता, संरक्षित पासवर्ड, ईमेल्स, सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी आदींबाबत तपशीलवार माहिती निवडणूक अधिकार्‍यांना करून देण्यात आली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांच्या हस्ते त्या पुस्तिकेचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या वेळी राज्याचे सायबर विभागाचे पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह, अधीक्षक डॉ. बाळिंसग राजपूत आदी उपस्थित होते.
 
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया अधिक सुटसुटीतपणे करण्यासाठी आयोगाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सध्याच्या सोशल मिडियावर प्रसारित होणारा मजकूर पाहता त्याचा गैरवापर होऊ नये आणि निवडणूक प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी बनविलेल्या पुस्तिकेत भारत सरकारने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या अॅप्सची यादी प्रसिद्ध केली आहे. आयोगाच्या सी-व्हिजिलसह इतर अधिकृत अॅप्स, संकेतस्थळे तसेच तक्रारींसाठी महत्त्वाच्या नोडल्स संस्थांची माहिती या पुस्तिकेत आहे. हॅक अथवा हायजॅक झालेल्या सोशल मीडिया खात्यांच्या बाबतीत महाराष्ट्र सायबरशी संपर्क साधण्याचे आवाहन अधीक्षक राजपूत यांनी केले आहे. ही पुस्तिका मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि उर्दू या भाषांत बनविण्यात आली आहे.
फेसबुक पोस्टच्या वर उजव्या बाजूच्या कोपर्‍यात ही फेक न्यूज स्टोरी आहे हा पर्याय तर व्हॉटसअॅपवर अफवा अथवा माहिती खातरजमा करण्यासाठी व्हॉटसअॅप चेकपॉईंट टीपलाइनवर पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. व्हॉटसअॅपवर निवडणुकीच्या संदर्भातील खोट्या बातम्या, अफवा, प्रक्षोभक मजकूर, चित्रांबद्दल सतर्क राहण्यासह त्याविषयी महत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या आहेत.