आंबेडकरांना एकीकृत रिपब्लिकन पक्षाचे नेते मानण्यास आठवले तयार
   दिनांक :14-Apr-2019
 
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रावर आधारित एकीकृत रिपब्लिकन पक्ष साकार करताना नेतृत्वाच्या वादात आपण पडणार नाही. दुय्यम स्थान स्वीकारण्याची आपली तयारी आहे. सर्व गट एकत्र येऊन रिपब्लिकन ऐक्य झाले आणि त्याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी केले तर त्यास आपला पािंठबा राहील, असे रिपाइंचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज रविवारी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.
 
 
 
डॉ. आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त आठवले यांनी आज दुपारी मुंबईत चैत्यभूमी येथे अभिवादन केले. त्यानंतर ते बोलत होते. रिपब्लिकन ऐक्याने युती कुणाशी करावी हे बहुमताने ठरवावे. प्रकाश आंबेडकर आणि आम्ही एकत्र आलो तर रिपब्लिकन ऐक्याची ताकद वाढेल. राजकीयदृष्ट्या समाजाचे महत्त्व वाढेल. ऐक्यासाठी आपण मंत्रिपद सोडायला तयार आहो, मात्र आपले मंत्रिपद घालविण्यापेक्षा मंत्रिपदाची सं‘या वाढविण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य करावे, असे ते म्हणाले.