IPL 2019: कोलकात्याचा सलग तिसरा पराभव
   दिनांक :14-Apr-2019
कोलकाता,
फिरकीपटू इम्रान ताहीरच्या भेदक गोलंदाजीनंतर सुरेश रैनाने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने रविवारी इडन गार्डनवर कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला. कोलकाताचे १६२ धावांचे लक्ष्य चेन्नईने ५ गडी राखून सहज पार केले. ताहीरने २७ धावांत ४ बाली मिळवले, तर रैनाने अर्धशतकी खेळी केली. कोलकाताचा हा सलग तिसरा पराभव ठरला. या विजयामुळे चेन्नईचे १४ गुण झाले असून ते प्ले ऑफच्या उंबरठ्यावर आले आहेत.

अर्धशतकी खेळी करणारा ख्रिस लीनला (८२) इम्रान ताहीरने तंबूचा रास्ता दाखविला. ताहीरने कोलकाताच्या चार प्रमुख खेळाडूंना बाद करत सामन्याचे चित्र पालटले. त्यामुळे कोलकाताला २० षटकांत ८ बाद १६१ धावा करता आल्या. ताहीरने ४ षटकांत २७ धावा देत ४ बळी मिळवले. तर, शार्दूल ठाकूरने दोन बळी घेतले.
 
कोलकात्याने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना आंद्रे रसेलने टाकलेल्या तिसऱ्या षटकात फॅफ ड्यू प्लेसिसने सलग चार चौकार खेचले. त्यानंतर चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हॅरी गर्नेयने चेन्नईचा सलामीवीर शेन वॉटसनला (६) बाद केले. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनाने सहावी धाव घेताच विक्रमाची नोंद केली. कोलकाता विरुद्ध सर्वाधिक ७६५ धावा करण्याचा विक्रम त्याने केला. रैनाने सनरायझर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरचा ७६२ धावांचा विक्रम मोडला.
 
 
सहाव्या षटकात फाफ ड्यू प्लेसिस बाद झाला. सुनील नरीनने त्याला २४ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर रैना व अंबाती रायुडू यांनी काही काळ संघर्ष केला, परंतु पियूष चावलाने ही जोडी फोडली. चावलाने रायुडूला (५) बाद केले. चावलाने पुढच्याच षटकात चेन्नईच्या केदार जाधवला (२०) पायचीत केले. चेन्नईने १४ षटकांत ४ बाद १०९ धावा केल्या. सुनील नरीनने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पायचीत केले. धोनीने १६ धावा केल्या. रैनाने ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधील त्याचे हे ३६वे अर्धशतक ठरले. या कामगिरीसह रैनाने विराट कोहली व गौतम गंभीर यांच्याशी बरोबरी केली. या दोघांच्या नावावर ३६ अर्धशतक आहेत. डेव्हिड वॉर्नर ३९ अर्धशतकांसह आघाडीवर आहे. १९व्या षटकात रवींद्र जडेजाने सलग तीन चौकार मारून चेन्नईला विजयासमीप आणले.