जगभरच उष्णतेची लाट
   दिनांक :14-Apr-2019
 पर्यावरण 
 
- अभय देशपांडे
 
 
जागतिक तापमानवाढीचे विविध परिणाम हवामानबदलाच्या स्वरूपात समोर येत आहेत. ठिकठिकाणी येणार्‍या उष्णतेच्या लाटा प्रदूषण कमी करण्याची गरज सातत्यानं व्यक्त करत आहेत. यंदाचं वर्ष 2018 पेक्षाही अधिक तापमानाचं वर्ष आहे. भारतासह जगभरात सर्वत्रच लोक यामुळे त्रस्त झाले आहेत आणि त्या त्या ठिकाणच्या वातावरणानुसार पावसाची वाट पहात आहेत.
 
प्रदूषणामुळे होत चाललेली जागतिक तापमानवाढ दर वर्षी अधिकाधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. यंदा भारतातली परिस्थिती पाहिली तरी याची पुरेशी कल्पना येईल. भारतात हवामान खात्यानं उष्णतेच्या लाटांची सूचना देण्यापूर्वीच संपूर्ण मार्च महिन्यात तापमानात वाढ झाली होती. साहजिकच अनेक ठिकाणी उष्माघाताचे प्रकार घडले. केरळमध्ये 1 मार्चपासून एप्रिलपर्यंत तब्बल 288 जणांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यामुळे राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मार्चमध्ये या भागात चारजणांचा उष्माघातानेच मृत्यू झाला असावा असा संशयही संबंधित यंत्रणा व्यक्त करत आहेत. या कालावधीत केरळच्या उत्तरेकडच्या पलक्कड जिल्ह्यातलं तापमानही 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. बंगळुरू शहरात सरासरी उन्हाळी तापमान सर्वसामान्यपणे 26 अंश सेल्सिअसपर्यंतच असतं. यंदा मात्र ते 37 अंशांवर पोहोचलं आहे.
 
मध्य कर्नाटकमधल्या कलबुर्गीमध्ये तापमान 40.6, बल्लारीमध्ये 40 आणि रायचूरमध्ये 39 पर्यंत गेलं होतं. महाराष्ट्रात मुंबईत 40.3 अंश सेल्सिअस तापमान होतं. शहराच्या नियमित तापमानाच्या तुलनेत सुमारे सात अंशांनी हे तापमान वाढलं होतं. नागपूरमध्ये तापमानवाढीनं हैराण झालेल्या लोकांना सावधगिरी कशी बाळगावी हे सांगण्यासाठी खास सभा, बैठका घ्याव्या लागत आहेत. पुणं थंड हवेसाठी प्रसिद्ध होतं. परंतु इथलं तापमानही 40 अंशांच्या पुढे जात राहिलं आहे. उत्तर भारतात तापमान सर्वत्र 40 अंशांच्या आसपास होतं. विशेषतः दिल्लीच्या आसपासच्या भागात तापमान अधिक होतं. दिल्लीत 39 अंश तापमान होतं आणि गेल्या नऊ वर्षांमधल्या तापमानाचा हा उच्चांक आहे. दिल्लीत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वाहणार्‍या वार्‍यांसह धुळीच्या वादळांची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
 
गेल्या वर्षीचा म्हणजे 2018 चा उन्हाळा हा 1901 पासूनचा सर्वाधिक उष्ण उन्हाळा असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र 2019 हा उच्चांक मोडत आहे. मध्य भारतातल्या बहुतेक सर्वच महानगरांमध्ये यंदा उन्हाळ्यात किमान सरासरी 0.5 अंशांनी अधिक तापमान असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मात्र मार्चमध्येच एवढं तापमान असेल तर मेपर्यंत ते किती वाढेल असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. भारतात 2010 ते 2018 या कालावधीत उष्माघातामुळे सुमारे 6,167 मृत्यू झाल्याचं अधिकृत अहवालात म्हटलं गेलं आहे. भारतात 1901 पासूनच्या सर्वाधिक पाच उष्ण वर्षांपैकी 2016 मध्ये सरासरी तापमानाच्या तुलनेत सरासरी तापमानाची नोंद 0.72 अंश अधिक झाली. त्यानंतर 2009 मध्ये 0.56, 2015 मध्ये 0.42 अंश आणि 2017 मध्ये 0.54 अधिक तापमानाची नोंद झाली. 2016 मध्ये राजस्थानमधील फालोदी इथे तर तब्बल 51 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. भारतातलं हे सर्वोच्च तापमान आहे. 1956 मध्ये फालोदीतलं तापमान 50.6 अंशांपर्यंत गेलं होतं. 
 
 
1901 पासूनच्या सर्वाधिक उष्ण 11 वर्षांमध्ये 1971, 1987, 1997, 2001, 2002, 2013 आणि 2015 या वर्षी उष्णतेमुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये भारतात अनेकपटींनी वाढ झाली होती. या लाटांना अर्थातच हवामानातले बदल म्हणजेच पर्यावरणाचं प्रदूषण कारणीभूत आहे. प्रदूषणाला आळा घातला गेला नाही तर यापुढे आणखी तापमानवाढीला तोंड द्यावं लागेल, असा इशारा पर्यावरणतज्ज्ञ देत आहेत. कारण भारतातच नव्हे; तर जगभर अशा लाटांचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या वर्षी युरोपमध्ये आणि अमेरिकेत अशा लाटा आल्या होत्या. यंदा नायजेरियात लोकांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागत आहे. बर्कले अर्थ या संशोधकांच्या स्वतंत्र गटानं तापमानाचं विश्लेषण करून जगाला 1951-1980 या कालावधीच्या तुलनेत यापुढे 0.77 अंश अधिक तापमानाला तोंड द्यावं लागण्याची शक्यता तीन वर्षांपूर्वी व्यक्त केली होती. नासानं याच संशोधनाचा आधार घेतला होता. मात्र 2018 हे वर्ष या अंदाजापेक्षा बरंच उष्ण ठरलं.
 
पाचवं उष्ण वर्ष म्हणून गणल्या गेलेल्या 2010 पेक्षाही हे वर्षं अधिक उष्ण होतं. एवढंच नव्हे, तर सर्वोच्च उष्ण हवामानाची चार वर्षं ही 2016 पासूनची चार वर्षं ठरली. हा अंदाज चुकण्याचं कारण काय? अर्थातच जागतिक तापमानवाढ प्रचंड प्रमाणात सुरू आहे हेच! नैसर्गिक हवामानाचा हा आकृतिबंध पाहता 2019 हे 2018 पेक्षा अधिक उष्ण वर्ष ठरेल, असं भाकित करण्यात आलं होतं आणि एप्रिलपर्यंतच ते खरंही ठरलं आहे.
 
सध्याच अल्‌ निनोचा प्रभाव वाढत चालला आहे. काही दिवसांमध्ये तो कमी होईल असंही म्हटलं जात आहे. मात्र पूर्ण उष्णकटिबंधीय पॅसिफिकच्या भागात तापमानात प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे सरासरी जागतिक तापमानात महासागरातून बाहेर पडणारी उष्णता मिसळली जात आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट अशी की, 2019 हे 1850 नंतरचं दुसर्‍या क्रमांकाचं उष्ण वर्ष असेल. पहिल्या क्रमांकावर 2016 च राहील. गेल्या काही आठवड्यांपासून नायजेरियामध्ये उष्णतेच्या लाटा उसळत आहेत. पुढल्या महिन्यात तिथे मोसमी पाऊस पडतो. तोपर्यंत तरी या भाजून काढणार्‍या उन्हापासून लोकांची सुटका होणं कठीण आहे. नायजेरियातल्या किनारपट्टीच्या प्रदेशांसह सर्वत्र तापमान 35 अंश सेल्सिअसहून अधिक होतं. एवढंच नव्हे, तर मिन्नासारख्या भागात ते 42.2 अंश सेल्सिअसवर पोहचलं होतं. तिथल्या पर्यावरणतज्ज्ञांनी वृक्षतोडीवर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे. याच दरम्यान जगभरच्या सागरांमध्येही तापमानवाढीमुळे उष्णतेच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. याचे सागरी जीवनावर मोठे दुष्परिणाम होतात. समुद्रशैवाल, मासे आणि इतर समुद्री सस्तन प्राणी वाढत्या तापमानात तग धरून राहू शकत नाहीत. त्यामुळे परिसंस्थांवर विनाशकारी परिणाम होतात आणि याचे गंभीर सामाजिक-आर्थिक परिणाम संभवतात.
 
अमेरिकेच्या मांटा आणि इतर संशोधकांनी नुकत्याच केलेल्या वायव्य अटलांटिक महासागरातल्या अभ्यासात समुद्री पाण्याच्या तापमानात 1.7 अंशांची वाढ झाल्याचं आणि त्यामुळे अनेक मासे व शैवालं मृत्युमुखी पडल्याचं आढळलं आहे. 2017 मध्ये सागरी पाण्यात आलेली उष्णतेची लाट ही त्या आधीच्या तीस वर्षांमधली सर्वाधिक उष्ण लाट होती आणि ती सुमारे तीन वर्षं टिकून राहिली होती. उष्णतेच्या लाटांमुळे शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे सतत थकवा येणं, हाता-पायात गोळे येणं, उष्माघात आणि मृत्यू असे परिणाम माणसांमध्ये दिसून येतात. विविध प्रकारचे श्वसनविषयक, मेंदूचे आणि हृदयविषयक आजार होतात. प्रौढ व्यक्ती, मुलं आणि श्वसनाचे आणि हृदयाचे विकार असलेले व मधुमेही रुग्ण याला अधिक बळी पडतात. गरीब आणि पदपथावर राहणार्‍या व्यक्तींना उष्णतेच्या लाटांचा अधिक त्रास होतो. याला आळा घालायचा असल्यास जगभरातल्या सरकारांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवून प्रदूषणाला आळा घातला पाहिजे. स्वयंसेवी आणि इतर सामाजिक संस्थांच्या मदतीनं ठोस कार्यक्रम आखले पाहिजेत, असं मत संशोधक व्यक्त करत आहेत.