घटांगच्या जंगलात भीषण अग्नितांडव
   दिनांक :14-Apr-2019
 
२० हेक्टर जंगल जळून खाक
 
धारणी:  मेळघाटच्या घटांग वनपरिक्षेत्रातील कामापूर आणि बिहाली जंगलात दोन दिवसात आग लागून अनेक वृक्ष आणि रोपवने नष्ट झाली आहेत. जंगलातील आगीमुळे तापमानात वाढ होऊन वन्य प्राण्यांची भटकंती सुरु झाल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
 
 
धारणी पासून ८० किमी अंतरावरील घटांग परिक्षेत्राच्या कामापूर आणि बिहालीच्या जंगलात मागील ४ दिवसात भीषण आग लागल्याने कोट्यवधीचे नुकसान होऊन पर्यावरणाला धोका उद्भवला आहे. कामापूरच्या जंगलात दोन वर्षापूर्वी करण्यात आलेल्या प्लान्टेशनच्या झाडांचे भयंकर नुकसान झाले आहे.
 
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्राकृतिक जंगलाला लागून असलेल्या घटांग जंगलात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा संचार असतो. जंगलातील कृत्रिम व नैसर्गिक आगीमुळे वन्यप्राण्यांच्या विचरणावर विपरित परिणाम होत असतो. या भागात फायर लाईनचे काम व्यवस्थित अथवा शास्त्रीय पद्धतीने करण्यात आले नसल्याने आगीचा विस्तार होऊन वणवा पेटलेला आहे. एका माहितीनुसार कामापूर आणि बिहाली जंगलात २० हेक्टर जंगलात आग पसरली होती. या आगीमुळे तापमानात प्रचंड वाढ होऊन वन्य प्राण्यांवर संकट कोसळले आहे.