तटरक्षक दलाने वाचवले ८ मासेमारांचे प्राण
   दिनांक :14-Apr-2019
अहमदाबाद:
 ट्रॉलर समुद्रात बुडत असल्याचा आपत्कालीन संदेश प्राप्त झाल्यावर तटरक्षक दलाने पोरबंदर तटवर्ती भागात तातडीने बचाव मोहीम राबवून ८ मासेमारांचे प्राण वाचवले आहेत.
 
 
 
प्रभू सागर नावाच्या बोटीतून शनिवारी रात्री आपत्कालीन संदेश प्राप्त झाला. ही बोट बुडत असून, त्यावर ८ जण असल्याची माहिती या संदेशात देण्यात आली. हा संदेश प्राप्त होताच तटरक्षक दलाची सी-४४५ बोट रवाना झाली. ती दोन तासांत बुडणार्‍या बोटीजवळ पोहोचल्यावर बचाव मोहीम राबवण्यात आली, असे तटरक्षक दलाने निवेदनात म्हटले आहे.
 
खवळलेला समुद्र आणि किट्ट अंधारात तटरक्षक दलाने बुडणार्‍या बोटीतून पम्पाच्या मदतीने पाणी काढणे सुरू केले. मात्र, समुद्र खवळला असल्याने मासेमारांच्या बोटीची एक लाकडी फळी तुटून बोट बुडाल्याने मासेमारांनी समुद्रात उड्या घेतल्या. त्यांना पाण्यातून काढून रविवारी सकाळी पोरबंदर बंदरावर आणले, असे तटरक्षक दलाने निवेदनात म्हटले आहे.