बालमित्र कोल्हा
   दिनांक :14-Apr-2019

हिरवा डोळा  
 
 
एक कावळा मांसाचा मोठा तुकडा तोंडात घेऊन उंच झाडावर बसला होता. त्याला पाहून कोल्हा झाडाखाली आला. कावळ्याच्या तोंडातले मांस खाली पडावे यासाठी कोल्ह्याने एक योजना आखली. म्हणून कोल्हा कावळ्याच्या सौंदर्याचे कौतुक करू लगला. कोल्हा म्हणाला, ‘‘अरे कावळ्या, तुझ्यासारखा देखणा पक्षी माझ्या पाहण्यात अजूनतरी आला नाही. तुझी पिसे किती सुंदर आणि किती कोमल आहेत. तुझ्या शरीराचे तेज पाहून मी भारावलो आहे. तू खरच खूप सुंदर आहेस. खर म्हणजे तुला छान गाताही येत असणार, नाही का..?’’ असे चतुर कोल्हा म्हणाला. ‘‘शब्द जर खरोखरच गोड असतील, तर मग तुझी बरोबरी कुणीच करणार नाही...’’ कोल्ह्याची ही स्तुती ऐकून पाहता पाहता कावळा पिघळला. कावळ्याने चक्क गायला सुरवात केली. मात्र तोंड उघडताच मांसाचा तुकडा खाली पडला. कोल्हा तुकडा घेऊन हसत हसत चालता झाला. या कथेचे तात्पर्य एकच की, आपल्या खोट्या प्रशंसेला भुलून जो लबाडाच्या नादी लागतो, ते बहुदा शेवटी फसतोच. म्हणून समाजातील अश्या
 

 
 
कोल्ह्यांच्या प्रवृतीपासून आपण सावध राहण्याचा बोध या कथेतून आपल्याला होतो.
लबाड कोल्हा, धूर्त लांडगा, चतुर कावळा अश्या एक ना अनेक उपाधींनी प्राणी व पक्ष्यांना आपल्या संस्कृतीत ओळखले जाते. मानवाला वन्यप्राण्यांचं बारस करण्याची हौस असल्याचे पावलोपावली दिसून येते. अशा काल्पनिक नामकरण विधीतून मग त्या प्राण्यांच्या प्रतिमा आपल्या मनात घर करू लागतात. वास्तवाशी निगडीत नसतानाही अशा प्राण्यांना आठवू पाहणार्‍यांना तसे गुण आणि अनुषंगिक विचारदेखील मनात येऊ लागतात. लबाड कोल्ह्याचा अशाच रूपाने आपल्याला मग परिचय होतो. मलाही बालपणी कोल्ह्याचा असाच परिचय झाला होता. बालसाहित्य, बालकथा व बालगीते याच रूपाने माझ्या समोर आलेत. ग्रामीण भागातून आलो असलो तरीही याच पद्धतीने मनात कोल्ह्याबद्दलही घर केलं होत. गावालगतच्या शेतात आम्ही एक दिवस पाडाचे पिकलेले आंबे पाडून खायचे या बेताने गोळा झालो. आंबे पाडून खाता खाता सायंकाळ झाली. घरी निघणार तोच शेजारच्या शेप्या नाल्यातून कोल्ह्याचा आवाज ऐकू आला. आम्ही तिघांनी तिथून कसलाही विचार न करता धूम ठोकली. गावात येताच मी बाबांना प्रश्न केला. बाबा कोल्हा आपल्याला खातो का..? बाबा हसले आणि म्हणाले, ‘कोल्ह्याच खाद्य माणूस नाही. तू घाबरू नकोस.’ बाबांच उत्तर ऐकून जीवात जीव आला. मग काय! रात्री मनातल्या मनात एक भन्नाट योजना आखली. ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी आम्ही कोल्हे पाहायचे ठरविले. बरोब्बर सायंकाळी नाल्याशेजारच्या बिब्याच्या झाडावर आम्ही चढून बसलो. कोल्हे मात्र फिरकेल नाहीत. चारआठ दिवस गेल्यावर एक दिवस आमची योजना रंगात आली. कोल्हा आणि दोन पिल्ले झाडाखालून जाताना आम्ही पहिले. मला कोल्हाच झालेलं ते पाहिलं दर्शन होत. आजही त्या शेप्या नाल्यातल्या कोल्हेकुईचा नाद कानात शाबूत आहे. कोल्हा आणि ती मंतरलेली सांयकाळ अस माझं कोल्ह्याशी असलेलं घट्ट नात आजही जीवन समृद्ध करणार आहे.
 
कोल्हा हा सस्तनी वर्गातील मांसाहारी प्राणी आहे. कॅनिडी म्हणजेच कुत्र्यांच्या कुळातील या प्राण्याचे शास्त्रीय नाव कॅनिस ऑरियस आहे. भारतात कोल्ह्यांच्या ऑरियस, इंडिकस व नेरिया अशा तीन प्रजाती आहेत. यातला भारतीय कोल्हा भारत, अरबस्तान, श्रीलंका आणि ब्रह्मदेशात आढळतो. भारतात हिमालयाच्या पायथ्यापासून कन्याकुमारीपर्यंत कोल्ह्यांचा वावर आहे. भारतीय कोल्हा उंचीला 38 ते 43 सेंमी असून शरीराची लांबी डोक्यासकट 60 ते 75 सेंमी असते. तर शेपूट 20 ते 27 सेंमी असून वजन 8 ते 11 किलो असते. कोल्ह्याचा रंग भुरकट व तपकिरी काळसर असतो. खांदे व कानालगत व पायांचा रंग काळा असून पांढरा व तो फिकट पिवळसर रंगाचे मिश्रण असते. मोकळी मैदाने व वाळवंट कोल्ह्याचा आवडत अधिवास आहे. दाट व विरळ जंगलातही कोल्हे आढळतात. कोल्हे मुख्यत: शहर व खेड्यांच्या आसपास राहणे पसंत करतात. शेतजमिनीत किंवा धुर्यावर किंवा पांदण भागात बिळे करून किंवा दाट गवतात ते घर करून हे राहतात. कोल्हा निशाचर असून भक्ष्यासाठी रात्रीच बाहेर पडतो. किडे, उंदीर तसेच ससा व इतर लहान सस्तन प्राण्यांवर तो आपली गुजराण करतो. वाघ आणि िंसह सारख्या प्राण्यांनी खाल्लेल्या प्राण्यांचे उरलेले मांसही कोल्हा खातो. विशेष म्हणजे िंसहाला आपल्या भक्ष्याजवळ तरस किंवा गिधाडे आलेली खपत नाहीत मात्र कोल्हा चालतो. कोल्हे बहुदा एकटे किंवा दोन ते तीनच्या समूहाने राहतात. कोल्ह्याची मादीला फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान चार पिल्ले देते. अलीकडच्या काळात कोल्ह्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. रस्ते अपघातात कोल्ह्यांचे वाढते मृत्यू, अधिवास अवनती, बदलते ग्रामीण जीवन, जंगलांचा व गवती कुरणांचा निमुळता होता जाणारा आकार कोल्ह्यांच्या जीवावर बेतत आहे. रानकुत्रा, लांडग्याप्रमाणे कोल्हे सुद्धा संवर्धनाच्या बाबतीत दुय्यम स्थानीचं आहेत. बालकथा व बालगीतांच्या पलीकडे जाऊन कोल्ह्याला आपण स्थिरावण्यासाठी जागा दिली नाही. म्हणूनच कोल्ह्यांची कोल्हेकुई भविष्यात ऐकू येणार की नाही अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. चला तर मग कोल्ह्यांचही संवर्धन करूया.
यादव तरटे पाटील
वन्यजीव अभ्यासक, दिशा फाउंडेशन, अमरावती.
9730900500