ऋतुराज वसंत!
   दिनांक :14-Apr-2019
 
 
कुहूऽऽऽ कुहूऽऽऽ अशी कोकिळेची सुरेल लकेर वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देते. वसंत ऋतू! नवचैतन्याने, उत्साहाने सळसळणारा ऋतू! हवेतला गारवा कमी कमी होत जाऊन, सुखद उबदारपणा जाणवू लागतो तो हा ऋतू!
चैत्र-वैशाख किंवा मार्च-एप्रिल हे महिने वसंत ऋतूचे मानले जातात. निसर्गात नवनिर्मितीची प्रक्रिया याच ऋतूत सुरू होते. शिशिरातील पानगळ थांबून वृक्ष नवीन पर्णांनी सजू लागतात. शिशिरातील आनंद-उत्साह जाणवू लागतो. आंब्याचे झाड मोहोराने फुलून जाते. त्याचा मंद सुगंध वातावरण भारून टाकतो. कोकिळेचे कुजन, पक्ष्यांचे गुंजन, रंगीबेरंगी भ्रमरांचे भ्रमण, सुगंधित फुललेला पांढराशुभ्र मोगरा, आसमंत नि माणसांची मनेही प्रफुल्लित करतात; तर गुलमोहराचे झाड, अग्निशिखेसारखी दिसणारी पलाश वृक्षांची लालभडक फुले वातावरण ‘रंगीन’ करून टाकतात.
 
 
 
‘ऋतुराज आज वनी आला, नव पर्णांचा, नव कलिकांचा बहर घेऊनी आला...’ असे वसंताचे कवीने केलेले यर्थार्थ वर्णन नि याला बहाल केलेली ‘ऋतुराज’ही पदवी! हे सगळे घडते ते निसर्गातील या किमयेमुळेच. कवींच्या प्रतिभेलाही बहर येतो तो याच ऋतूत. निसर्गगीत, आनंदगीत, तर विरहगीतही कवीला स्फुरतात.
वसंतपंचमीला देवाला आंब्याचा मोहोर वाहण्याचा प्रघात आहे. निसर्ग मानवाला एवढे भरभरून देतो, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सुंदर प्रकार आहे. भारतात या ऋतूचे जल्लोषात स्वागत होते. उत्तरेकडील राज्यांत बैसाखीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. भांगडा नृत्य करून लोक या ऋतुराजाचे स्वागत करतात. महाराष्ट्रात नवीन वर्षाची सुरुवात याच ऋतूत होते. गुढीपाडवा हा नववर्ष दिन म्हणून साजरा करतात. नवीन आम्रपल्लव, कडुिंनबाची कोवळी लुसलुशीत पाने, साखरगाठी गुढीला घालून, गुढी उभारून नववर्षाचे- या ऋतुराजाचे स्वागत केले जाते. कडुिंनबाची कोवळी पाने खाऊन ‘आरोग्यमंत्र’ही दिला जातो. नवनिर्मितीचे, नवचैतन्याचे स्वागत याहून सुंदर काय असू शकते!
वसंत ऋतूतला हा निसर्ग, त्याचे विलोभनीय रूप माणसाच्या जीवनात आनंदाचे विविध रंग भरतो. माणसाला निराशा, उदासीनता, आळस झटकून टाकून क्रियाशील बनविण्यास प्रोत्साहित करतो. नवीन संकल्प, नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी एक नवी उमेद देतो. ऋतुचक्र आपल्याला हेच सुचवीत असते की, आशा-निराशा, दु:ख-संकट, आनंद-दु:ख, चांगले-वाईट दिवस हे माणसाच्या जीवनात येतच असतात. पण, पतझडनंतर नवीन बहारही येतच असते. तेव्हा निराश न होता, खचून न जाता, कठीण परिस्थितीतून मार्ग काढलाच पाहिजे.
आनंदी जीवन जगण्याची, स्वत:ची प्रगती साधण्याची ही नवीन दृष्टी, हा ऋतुराज वसंत आपल्याला देत असतो, नाही का?
मंजिरी मुकुंद अनिंसगकर
8698598764