धोनीवर २-३ सामन्यांची बंदी घालायला हवी होती- सेहवाग
   दिनांक :14-Apr-2019
राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने, पंचांनी मागे घेतलेल्या नो-बॉलच्या निर्णयावर मैदानात येऊन आपली नाराजी व्यक्त केली. ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीचं एक वेगळच रुप यावेळी प्रेक्षकांना पहायला मिळालं. धोनीच्या या वागणुकीवर अनेक माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. सामनाधिकाऱ्यांनी या कृत्याबद्दल धोनीच्या मानधनातली ५० टक्के रक्कम कापूनही घेतली. मात्र भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागच्या मते धोनीवर किमान 2-3 सामन्यांची बंदी घालणे गरजेचे होते.
 
 
“समजा धोनी भारतीय संघासाठी असा भांडला असता तर मला आवडले असते. त्याच्या कर्णधारपदाच्या काळात मी त्याला कधीही इतकं रागावलेले पाहिले नाही. त्यामुळे माझ्यामते आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघासाठी तो जरा भावूक झाला. ज्यावेळी दोन फलंदाज पंचांशी बोलत असताना धोनीला मैदानात येण्याची गरज नव्हती.” सेहवाग क्रिकब्ज संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सेहवाग बोलत होता.
“माझ्या मते धोनीवर किमान २-३ सामन्यांची बंदी घालायला हवी होती. उद्या धोनी पुन्हा असं वागला, तर इतर कर्णधारही त्याच्याप्रमाणे वागतील. असं झालं तर पंचांचं महत्वं राहिल का?? त्यामुळे एक कठोर उदाहरण दाखवून देण्यासाठी धोनीवर कारवाई होणं गरजेचं होत. त्यावेळी धोनीने बाहेर राहून वॉकी-टॉकीवर चौथ्या पंचांशी बोलणं योग्य ठरलं असतं.” सेहवागने आपलं कठोर मत मांडलं. या घडीला आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने धोनीच्या कृत्याची दखल घेत त्याच्या मानधनातली 50 टक्के रक्कम कापली आहे.