मुफ्ती आणि अब्दुल्ला कुटुंबांनी काश्मीरच्या तीन पिढ्या उद्ध्वस्त केल्या: नरेंद्र मोदी
   दिनांक :14-Apr-2019
पंतप्रधान मोदी जम्मूतील कठुआ येथे एका विराट जनसभेला संबोधित करतांना म्हणाले कि " मुफ्ती आणि अब्दुल्ला कुटुंबांनी काश्मीरच्या तीन पिढ्या उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यांनी काश्मीरचे प्रचंड शोषण केलं आहे." 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये पहिली प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांवर सडकून टीका केली. अब्दुल्ला, मुफ्ती कुटुंबीयांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना मी देशाचे तुकडे करू देणार नाही. मी एका भिंतीसारखा त्यांच्यासमोर उभा राहीन अशा शब्दात मोदींनी पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सवर आणि अनुल्लेखाने फुटीरतावाद्यांवर निशाणा साधला.
 
 
 
तर २०१४ मध्ये मला मतदान केल्यामुळेच काश्मीरमध्ये सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांना आरक्षण मिळत आहे असंही त्यांनी सांगितले. आपल्या भाषणात एअर स्ट्राइक, सर्जिकल स्ट्राइकचं कौतुकही त्यांनी केले. ‘सर्जिकल स्ट्राइक , एअर स्ट्राइकचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. पण या हल्ल्यांमुळे विरोधकांच्या पोटात इतकं का दुखतंय? त्यांना नक्की कोणाचे समर्थन मिळतं आहे?’ असा सवालही त्यांनी विचारला. त्याचवेळी संरक्षणविषयक करार काँग्रेससाठी फक्त पैसा कमवण्याचा मार्ग आहेत अशी टीकाही त्यांनी केली. ‘काँग्रेसला देशाच्या सुरक्षेशी काही घेण-देणं नव्हते. भारतीय सैन्य त्यांच्यासाठी पैसे कमवण्याचा एक मार्ग होता. सुरक्षा करारांमधून फक्त पैसे लुटण्याचे काम त्यांनी केले’ अशी टीका मोदींनी केली आहे.
 
 
मोदी न झुकेगा, न डरेगा, न बिकेगा
पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सला जितके प्रयत्न करायचे आहेत तितके प्रयत्न त्यांनी करावे. मला जितक्या शिव्या द्यायच्या आहेत त्यांनी द्याव्यात. मला त्यांना सांगायचं आहे की मोदी कधीच त्यांना घाबरणार नाही, त्यांच्यासमोर वाकणारही नाही आणि कधी विकलाही जाणार नाही. अशा शब्दात मोदींनी काश्मीरच्या स्थानिक पक्षांना लक्ष्य केले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सुरक्षा सर्वतोपरी आहे असंही मोदींनी अधोरेखित केले आहे.