मतदान करण्यासाठी 'त्याने' सोडली ऑस्ट्रेलियातील नोकरी
   दिनांक :14-Apr-2019
भारतात आणि भारताबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक चाहते आहेत. त्यांचा एक चाहता तर अलीकडे ऑस्ट्रेलियातील नोकरी सोडून भारतात परतला. सुधींद्र हेब्बार (४१) असे या मोदी समर्थकाचे नाव आहे. 
 
 
सुधींद्र सिडनी एअरपोर्टवर स्क्रीनिंग अधिकारी पदावर कार्यरत होते. विमानतळावरील प्रवासी संख्या लक्षात घेता सुट्टी वाढवून मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर सुधींद्र यांनी सरळ नोकरीचा राजीनामा दिला व भारतात परतले. त्यांनी दीड वर्ष ऑस्ट्रेलियात नोकरी केली. काहीही करुन मला माझा मतदानाचा हक्क बजावायचा होता. त्यामुळे मी राजीनामा दिला व मायदेशी परतलो असे सुधींद्र म्हणाले. सुधींद्र हेब्बार यांना पुन्हा मोदींना पंतप्रधान झालेले पहायचे आहे.
सुधींद्र एमबीए पदवीधर आहे. सिडनी विमानतळावर मी जगभरातील लोकांसोबत काम केले. यात युरोपियन, पाकिस्तानी लोकसुद्धा होते. भारताला उज्वल भविष्य आहे हे जेव्हा मी या लोकांच्या तोंडून ऐकायचो तेव्हा मला अभिमान वाटायचा. भारताच्या या बदलत्या प्रतिमेचे श्रेय मी पंतप्रधान मोदींना देतो. मातृभूमीच्या रक्षणसााठी मी सीमेवर जाऊ शकत नाही. पण कमीत कमी मतदानाचे कर्तव्य बजावू शकतो. मी ऑस्ट्रेलियाचा कायमस्वरुपी कार्ड होल्डर आहे. विमानतळावर नोकरी करण्याआधी मी सिडनी रेल्वेमध्ये काम केले आहे.
दुसरी नोकरी मिळवणे कठीण नाही असे सुधींद्र हेब्बार यांनी सांगितले. पाच वर्षांपूर्वी १७ एप्रिल २०१४ रोजी कर्नाटकात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. त्यावेळी सुधींद्र पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात गेले. त्यावेळी सुद्धा ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याआधी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत सुधींद्र मंगळुरुमध्येच राहणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियात परतून ते नवीन नोकरी शोधतील.