आणखी १०० भारतीय मासेमारांची मुक्तता
   दिनांक :14-Apr-2019
 
 

 
इस्लामाबाद: द्विपक्षीय तणाव कमी करण्यासाठी भारताला सदिच्छा संदेश देताना पाकिस्तानने आज रविवारी आणखी १०० भारतीय मासेमारांची मुक्तता केली.
पाकिस्ताने एकूण ३६० भारतीय मासेमार आणि कैद्यांची मुक्तता करण्याची घोषणा अलीकडेच केली होती. पाकिस्तानने ७ एप्रिल रोजी १०० मासेमारांची मुक्तता केली होती. त्यानंतर आता पुन्हा १०० मासेमारांना मुक्त करण्यात आले.
हे सर्व मासेमार कराचीतील कारागृहात बंद होते. त्यांना लाहोरहून रेल्वे गाडीने नेण्यात येत असून, वाघा सीमेवर त्यांना भारतीय अधिकार्‍यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. आंतरराष्ट्रीय समुद्री हद्द ओलांडून पाकिस्तानच्या पाण्यात मासेमारी करण्याच्या आरोपात या मासेमारांना अटक करण्यात आली होती. २२ एप्रिल रोजी आणखी १०० मासेमारांची सुटका करण्यात येणार आहे.