ऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर अंदाधुंद गोळीबार
   दिनांक :14-Apr-2019
ऑस्ट्रेलियात नाइट क्लबच्या बाहेर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबारात अनेकजण जखमी झाले असून मेलबर्न शहरात हा गोळीबार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याशिवाय इतर दोघे जखमी असून त्यांच्या जीवाला धोका नसल्याचंही पोलिसांनी सांगितले आहे.
 
पहाटे ३ वाजून २० मिनिटांच्या सुमारास हा गोळीबार सुरु झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटनेची माहिती मिळाली तेव्हा हा दहशतवादी हल्ला आहे की नाही याबाबत कोणतीही कल्पना मिळाली नव्हती असंही त्यांनी सांगितले. द एज वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या नाईटक्लबचं नाव 'लव्ह मशीन' असून जखमी झालेल्यांपैकी एक सुरक्षारक्षक आहे. त्याच्या चेहऱ्यावर गोळीबार करण्यात आला. पोलीस सध्या तपास करत असून अद्याप कोणालाही अटक कऱण्यात आलेली नाही.