मंगळावरील खडकांचे नमुने घेण्यात 'नासा' ला यश
   दिनांक :14-Apr-2019
वॉशिंग्टन:
 मंगळ ग्रहावर २०१२पासून असणाऱ्या 'नासा'च्या 'क्युरिऑसिटी' रोव्हरने पहिल्यांदा तेथील खडकांचे नमुने तपासले आहेत. या मोहिमेतील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे मानण्यात येत आहे.
 
 
'क्युरिऑसिटी' २०१२मध्ये मंगळावरील 'शार्प' या पर्वतावर उतरले होते. या ग्रहावर २३७७ दिवसांपासून हे रोव्हर असून, त्यामध्ये विविध निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. याचाच पुढील भाग म्हणून या रोव्हरने सहा एप्रिल रोजी 'अबरलेडी' असे नाव दिलेल्या खडकाला छिद्र पाडत, त्यातून नमुने गोळा केले. हे नमुने या रोव्हरमध्येच असलेल्या खनिजांच्या छोटेखानी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. या आधीच्या खडकांच्या तुलनेमध्ये या वेळी खडकाला छिद्र पाडण्यामध्ये फारशा अडचणी आल्या नाहीत, असे 'नासा'च्या निवेदनात म्हटले आहे.
'हे रोव्हर सात वर्षांपासून मंगळ ग्रहावर आहे. अखेर आम्हाला खडकाचे नमुने घेण्यात यश आले असून, हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा टप्पा आहे,' असे 'नासा'च्या क्युरिऑसिटी प्रकल्पाचे व्यवस्थापक जिम एरिक्सन यांनी सांगितले.
या प्रकारच्या खडकांमध्ये आढळणारी खनिजे प्रामुख्याने पाण्यामध्ये आढळणारी असतात. त्यामुळे, या नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी शास्त्रज्ञ खूपच उत्सुक आहेत, असेही 'नासा'ने म्हटले आहे. 'नासा'च्याच अन्य एका मोहिमेमध्ये या भागातील खडकांचे विश्लेषण करण्यात आले होते.