आपलीच येतेना सीट...
   दिनांक :14-Apr-2019
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आटोपले. क्रिकेटच्या भाषेत सांगितले तर कळायला सोपे जावे म्हणून आता पहिला पॉवर प्ले आटोपला आहे. हे सार्वत्रिक निवडणुकांचे काम खूप आडमूड आहे. त्याचा आर अन्‌ पार काही लागतच नाही. म्हणजे लहानपणी (म्हणजे आता जी पिढी प्रौढ आहे त्यांच्या लहानपणी) जेव्हा टीव्हीवर रामायण आले नव्हते असा टीव्ही, रामायणपूर्व काळ असलेल्या बालपणात जेव्हा हनुमान प्रत्येकाच्या मनातला वेगळा असायचा अन्‌ त्याला काहीच मर्यादा नसायच्या. म्हणजे कुणाच्या मनातला हनुमान त्याच्या शेपटाने पृथ्वी गुंडाळून फेकून देऊ शकायचा... म्हणजे आताच्या रजनीकांतपेक्षाही अतर्क्य गोष्टी करण्याची त्यावेळी मनातल्या हनुमंताची ताकद दसपट होती. म्हणजे त्याचा आर नि पार लागत नव्हता, तसेच या निवडणुकांचे वास्तव आहे. आता कुठे पहिला टप्पा आटोपला आहे. त्यात 91 जागांचाच हिशेब झाला. आणखी 455 जागांचे मतदान राहिले आहे. काही ठिकाणी तर नॉमिनेशन भरण्याची तारीखही अद्याप आलेली नाही. हे इतके अवाढव्य आहे की आता 11 एप्रिलला झालेल्या पहिल्या टप्यात मतदारांची संख्या रशियाच्या लोकसंख्येपेक्षा थोडी अधिकच होती अन्‌ ज्या सरासरी 60 टक्के मतदारांनी मतदान केले त्यांची संख्या भारतीय उपखंडातील चीन आणि जपान हे देश सोडले तर बाकी देशांची एकत्र लोकसंख्या आहे. 90 कोटी एकूण मतदार आहेत ना राजेहो. युरोप खंडातील देशांची लोकसंख्या याच्या तीन चतुर्थांश आहे... या सगळ्यांचे व्यवस्थापन करणे म्हणजे काय गंमत आहे का? आयुष्यात एकदाच पोटची लेक उजवावी लागते अन्‌ ते कार्य सावरता सावरता बापाची पार वाट लागत असते. हे तर लोकशाहीचे पंचवार्षिक लग्नच आहे. दरवेळी ते वाढतेच आहे. हे सारे सांभाळणे म्हणजे सत्तेत मित्र असताना शिवसेनेला सांभाळण्याइतकेच कठीण आहे. तरीही ते करावेच लागत असते. एकतर भारतातल्या जनतेची राजकीय समज अफाटच ना! म्हणजे बाकी काही कळणार नाही; पण राजकारण कळतेच. अगदी फाटका माणूसही, ‘‘मले राजकारण शिकवून राह्यला का?’’ असे विचारतो. जे मोठमोठे पक्ष चालवितात अन्‌ राजकारणात ज्यांच्या पिढ्या गेल्या आहेत अशांनाही नाही कळत कुणाला कुठे तिकिट द्यायची. पण पानटपरीवर उधारीत पान खाणार्‍या नाहीतर मग फुकटात तंबाखू चोळणार्‍याला मात्र हे कळते की कुणाला कुठे तिकिट द्यायला हवी. म्हणजे गावाची वेसही फारशी ओलांडली नसते अन्‌ त्याला हे कळते की पश्चिम बंगालमध्ये उत्तर कोलकात्यात कुणाला तिकिट द्यायला हवे...
हे असे सगळेच अफाट आहे. मतदारांची संख्या अफाट अन्‌ कुठे वैराण वाळवंट आहे तर कुठे बर्फच बर्फ... असे कमालीचे वैविध्य आणि वैचित्र्य असे असताना निवडणुका घेणे म्हणजे मज्जाकच नाही ना भाऊ!
 
 
 
त्यात आता पहिला टप्पा आटोपला आहे. 21 मे पर्यंत हा क्रम चालेल. त्यानंतर मग साराच निकाल एकाचवेळी लागेल. देश आरपार पसरला असला अन्‌ भाषा वेगवेगळ्या असल्या तरीही आमचे राजकारण मात्र एकच आहे. त्यामुळे इकडच्या निकालाचा परिणाम तिकडे होतो. म्हणून मग फर्स्ट ईयरचा निकाल आधी अन्‌ मग सेकंड ईयरचा असे होत नाही. या परीक्षेत नापास झालेल्यांना चान्स नसतो. अर्थात काही खास नापास झाले तर त्यांना मग राज्यसभेवर घेतले जाते. मंत्रीही केले जाते. ती मंडळी एकदम खासमखास असतात. मग ती कुठल्याही पक्षांत असली तरीही संसदेत हवी असतात...
आता हे राजकारण रंगले आहे. इकडची लाट तिकडे गेली आहे. आता इकडे मतदान झाल्यावर कार्यकर्ते आरामात आहेत. म्हणजे जरा फिरून येतो म्हणून शिर्डीले गेले कुणी तर कुणी शनििंशगणापूरच्या नावानं साऊथला गेले आहेत. तितकेच फिरणे होते अन्‌ तिकडचा माहोलही पाहून येणे होते. इलेक्शनचा माहोल असा असतो की कुणाचीच सीट क्लियर नसते. सुरुवातीला वाटते की तमका तर निवडूनच आला आहे. त्यानं फॉर्म भरला म्हणजे तो निवडून आला आहे... नंतर मात्र माहोल बदलत जातो. मतदान झाले की मग पहिल्या रांगेतल्या चार-पाच जणांना तर वाटतेच की आपण आलोच आहोत. आपली सीट निघालीच आहे. कार्यकर्ते अन्‌ गल्लोगल्ली पसरलेले राजकारण पंडित, भाऊ, दादा, ताईंना हवा भरून देत असतात की, भाऊ आपली सीट निघाली आहे ना... कशी? त्याचेही त्यांचे प्रत्येकाचे गणित तयार असते. एकतर मुख्य उमेदवाराशी केवळ आपलीच फाईट होती, हे नक्की केले जाते. मग विद्यमान खासदार हा आता कसा त्याच्याच पक्षात नकोसा होता, त्याची तिकिट रोखण्याचा कसा प्रयत्न झाला, हे मांडले जाते. ‘गावगाव कार्यकर्ते त्याच्या विरोधात काम करत होते ना भाऊ!’ असे सांगितले जाते...आता हे खरे की त्याच्या विरोधात; पण मग आपल्यासाठीच काम केले, असे कसे? तर वििंनग कँडिडेट (!) साठीच काम करतीन का नाही थे? लोकबी पाह्यतेना का आपलं मत वाया नाही जाले पाह्यजेन... म्हणून मग आपल्याला मतदान झाले. त्यात मग आपल्या समाजाचे इतके मतं. त्यात आपल्या समाजातून दुसरा कुणी उभा नव्हता, त्यामुळे मते डिव्हाईड होण्याचे काही कारण नाही. त्यात त्यांच्या समाजाची मते जास्त आहे; पण चार जणांत डिव्हाईड झाले. आपण सभा जास्त नाही घेतल्या; पण संपर्कावर भर दिला. लोकायले थेच आवडलं ना भाऊ... अशी अनेक गणितं असतात. यंदा तुम्ही आले असे आपल्या उमेदवाराला कार्यकर्ते समजावून सांगत असतात. अगदी ज्याचे डिपॉझिट जप्त होणे ही परंपराच असते अशालाही निकाल लागेलपर्यंत हेच समजावून सांगितले जाते की त्याची सीट निघाली आहे. म्हणजे काहीही अंदाज लावले जातात. काहीही म्हणजे काहीही... तो तमका नेता त्याच्या भाषणात असं म्हणाला त्याचा परिणाम आपल्यासाठी असा झाला अन्‌ मग आपण निवडून येणारच, मधल्या काळात तमका सण आला अन्‌ तो आपल्या समाजाचा आहे त्यामुळे मते आपल्याकडेच वळली, मतदानाच्या दिवशी तुमच्या नावराशीत विजयच होता... असे काहीही म्हणजे ‘काहीही हं श्री!’ पेक्षाही काहीऽऽ अंदाज लावले जातात. हे असे अंदाज लावताना आपला पक्ष काय, आपली पोजिशन काय, आपला रीच काय, अनुभव काय... याचा काही तर विचार करायचा ना! या काळांत तर बाबा अन्‌ ज्योतिषांचाही धंदा असतोच. मग नारायण नागबलीही करायला लागतो. तुमच्या भविष्य पत्रिकेत तमका ग्रह चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे गुरुची ग्रहदशा अशी आहे अन्‌ मतदानाचा दिवस नेमका गुरुवार आहे, गजानन बाबा िंकवा साईबाबाची कृपा तुमच्यावर आहेच, त्यामुळेच नेमका मतदानाचा हा दिवस आला. त्यामुळे वेळेवर अनेक मते फिरणार आहेत... असे सांगण्यात येते. एका उमेदवाराला तर त्याच्या पोहोचलेल्या बाबाने अंगारा दिला होता अन्‌ त्याने सांगितले होते की प्रत्येक मतदान केंद्रात पहिले मत तुमच्या कार्यकर्त्याला टाकायला सांगा अन्‌ त्यावेळी इव्हीएम मशीनला हा अंगारा लावायला लाव... मग सगळीकडेच तशी पहुंच नाही अन्‌ एखादवेळी ते शक्यही नसेल म्हणून त्याने तिथल्या कर्मचार्‍यांना पैसे देवून अंगारा लावायला लावला... तरीही तो पडला अन्‌ मग बाबा म्हणाले, कोंच्या हाताने लावला? नक्कीच डाव्या हाताने लावला असेल... आता इतका खर्च आणि वेळ, श्रम वाया घालविल्यावर निकाल लागेपर्यंत आपणच निवडून येतो, असे ख्वाब पाहणे वाईट थोडीच आहे? पप