काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या संस्थेच्या वसतीगृहात दोन मुलींवर अत्याचार
   दिनांक :14-Apr-2019
 
वसतीगृह अधीक्षकाला अटक
आदिवासी संघटन आणि महिला संघटनेत तीव्र रोष
 
चंद्रपूर: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे तथा राजुर्‍याचे नगराध्यक्ष अरूण धोटे हे अध्यक्ष व सचिव असलेल्या संस्थेच्या अख्यारित येत असलेल्या एका वसतीगृहात दोन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राजुरा शहरातील इन्फंट जिसस पब्लिक स्कूल येथे नर्सरी ते दहवीपर्यंतची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे. याच शाळेच्या आवारात हे आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत वसतीगृह चालविले जाते. या वसतीगृहातील दोन मुलींवर लैंगीक अत्याचार झाल्याची बाब उघड होताच सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वसतीगृहाचे अधीक्षक छगन पचारे यांना १३ एप्रिलला अटक केले असून, त्याच्याविरूध्द ३७६ (इ. बी.), पास्को कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
इन्फंट जिजस इंग्लीश पब्लिक हायस्कूल येथे शिकणार्‍या दोन मुलींना चक्कर येत असल्याच्या कारणावरून राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु, मुलींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना लगेच चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. चंद्रपूर येथील उपचारादरम्यान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी चंद्रपूर व राजुरा या दोन्ही ठिकाणी तक्रारी केल्याची बाब समोर येत आहे. परंतु, तक्रारकर्ते नेमके कोण आहेत, याबाबत पोलिसांकडून गुप्तता पाळण्यात येत आहे.

 
 
दरम्यान, शालेय अल्पवयीन विद्यार्थीनींचे प्रकरण बघता स्वत: जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संपूर्ण यंत्रणा कामी लावली आहे. स्वत: जिल्हा पोलिस अधीक्षक, राजुर्‍याचे उपविभागीय पोलिस अधिकारी शेखर देशमुख, पोलिस निरीक्षक बाळू गायगोले यांनी शाळेत जाऊन वसतीगृहाच्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज व अन्य यंत्रणेचीही कसून तपासणी केली. शाळेत काही संशायास्पद साहित्यातही आढळून आल्याचे बोलल्या जात आहे. परंतु, पोलिस प्रशासनाच्या वतीने याबाबत गुप्तता पाळल्या जात असून, या प्रकरणात आणखी काही मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
या प्रकरणात शाळेतील अन्य कर्मचार्‍यांची चौकशी होईल तसेच आणखी काही बयाण नोंदविले जातील. या मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळत आहे. आदिवासी समाज, महिला संघटना यांच्या बैठकी सुरू असून, येणार्‍या काळात सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
नियमांच्या नावावर अगदी कडक वाटणार्‍या या शिक्षण संस्थेत अशा प्रकारच्या हिन प्रकार घडतो यावर पालकर्गातही चिंतेची व संतापाची लाट पसरली आहे. सगळी यंत्रणा असतानाही हा प्रकार घडणे शालेय प्रशासनाला एक प्रकारे आवाहन देवून त्यांची निष्क्रीयता चव्हाट्यावर आणणार्‍या आहेत. या प्रकरणाने अन्य कर्मचारी भयभित झाले असून, येणार्‍या काळात नेमके कुणाची नावे समोर येतात व यापूर्वीही असा प्रकार घडला तर नसावा, अशी चर्चा सुरू आहे.
कोणत्याही प्रकारची भिती किंवा ताण-तणाव न बाळगता विद्यार्थी-पालकांनी पोलिसांना सहकार्य करावे व या प्रकरणातील किंवा पूर्वीही काही घटना घडल्या असतील, तर त्याविषयी न घाबरता पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस तपास सुरू असून, लवकरच या संपूर्ण प्रकरणाचा तीळा सुटेल अशी आशा पोलिस प्रशासनाला आहे. दरम्यान
या प्रकरणी कुणाचीही हयगय केली जाणार नाही. जो दोषी असेल, त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच हवी, असे मत सुभाष धोटे यांनी व्यक्त केले आहे.
 
प्रकरण दाबले अन् आरोपी मोकाट सोडले, तर आंदोलन: शोभाताई फडणवीस
वसतीगृहातील दोन अल्पवीयीन मुलींवर अत्याचार होतो आणि तोही त्यांना बेशुध्द करून, ही अत्यंत क्लेषदायक आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. या दोन मुलींना त्यांच्यासोबत काय झाले, याचेही पुरेपूर कल्पना नाही. त्यांना वारंवार दवाखान्यात भरती करून, प्रकरण दाबण्याचे प्रयत्न झाले. सुदैवाने डॉक्टरांच्या ते लक्षात आले. आम्ही स्वत: त्या मुलींशी बोललो. त्या अतिशय घाबरलेल्या होत्या. अशा अन्य मुलीपण असू शकतात. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे. तसे आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनाही सांगितले. त्यांनी तातडीने पाऊल उचलली खरी, पण जर हे प्रकरण दाबले गेले अन् आरोपी मोकाट सोडले गेले, तर मर्दानी महिला मंच तीव्र आंदोलन उभे करेल, असा इशारा मर्दानी महिला मंचच्या अध्यक्ष तथा माजी आमदार शोभाताई फडणवीस यांनी 'तभा'शी संवाद साधतांना दिला.