चंद्रकांतदादा, तुम्ही कुणामुळे निवडून आले ते आठवा!
   दिनांक :14-Apr-2019
 
 सातारा: चंद्रकांतदादा, आम्ही मनाने राजे आहोत. मनाने किती मोठा आहे, ते तुम्हाला ठाऊक आहे. पदवीधर निवडणुकीत आम्ही किती मदत केली होती, त्याबद्दल आठवण ठेवा. त्यावर आता मला काही बोलायचे नाही, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे खासदार व आता लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना दिला आहे.
उदयनराजे भोसले यांनी विकासकामांचा निर्धारनामा प्रसिद्ध केल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढील पाच वर्षांतील कामाचे नियोजन आम्ही केलेले आहे. नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. अनेक मोठी विकासकामे मार्गी लावली. यापुढेही कुठे कमी पडणार नाही. शेती, पाणी, आरोग्य, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रासाठी पुढील पाच वर्षांत कामे केली जातील, असे उदयनराजे भोसले म्हणाले. उच्च शिक्षण व कौशल्य विकासाला प्राधान्य देऊ. करीअर डेव्हलपमेंट कोर्स सेंटरची उभारणी केली जाणार आहे. सातारा रेल्वे स्टेशनची सुधारणा करण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. लोकांना रोजगार, घरे मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न होतील. कृष्णा नदी शुद्धीकरण मोहीम हाती घेतली जाईल. जाहीरनाम्यानुसारच सर्व कामे होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.