वी. थंगपांडियन महानिर्मितीचे नवे संचालक
   दिनांक :14-Apr-2019
 
 
नागपूर: देशातील वीज उत्पादन क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या अग्रमानांकित महानिर्मिती या कंपनीमध्ये वीज क्षेत्रातील चतुरस्र अनुभव संपन्न असे वी. थंगपांडियन हे महानिर्मितीच्या संचालकपदी (प्रकल्प) १० एप्रिलला रुजू झाले. महानिर्मितीच्या प्रस्तावित औष्णिक व सौर ऊर्जा प्रकल्पांना साकारण्यासाठी त्यांची महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे.
याप्रसंगी महानिर्मितीचे संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(वित्त) संतोष आंबेरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन वी. थंगपांडियन यांचे स्वागत केले. वी. थंगपांडियन यांनी सन १९८१ मध्ये मदुराई कामराज विद्यापीठातून बी.ई.(मेकॅनिकल) हि पदवी प्रथम श्रेणीत प्राविण्यासह उत्तीर्ण केलेली आहे. २५०० मेगावॅट नेवेली लिग्नाईट वीज प्रकल्प, ३६६० मेगावॅट घाटमपूर वीज प्रकल्प,३८०० मेगावॅट नेवेली ओरिसा प्रकल्प, २ु६६० नेवेली-२ अशा विविध वीज प्रकल्पांचे अभियांत्रिकी, बांधकाम, विकास व उभारणी कामे तसेच सुमारे ४२४० मेगावॅट औष्णिक ऊर्जा, ५१ मेगावॅट पवन ऊर्जा, ४४० मेगावॅट सौर ऊर्जा केंद्रांच्या संचालनाचा त्यांना दांडगा अनुभव आहे.
 
 
 
नागपूर जिल्ह्यातील एनटीपीसी मौदा येथील २३२० मेगावाट, विंध्याचल येथील ३२६० मेगावॅट येथील वीज प्रकल्पांचे प्रमुख म्हणून तर ३ु२०० मेगावॅट, ३५०० मेगावॅट रामागुंडम वीज प्रकल्प उभारणी कामे व विशेषत: बाष्पक देखरेख कार्यभार त्यांनी यशस्वीपणे सांभाळला आहे.
संचालक (पॉवर) नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन, ग्रुप जनरल मॅनेजर/ जनरल मॅनेजर(एनटीपीसी मौदा), जनरल मॅनेजर(संचलन व सुव्यवस्था) / अतिरिक्त जनरल मॅनेजर एनटीपीसी विंध्याचल अशा विविध महत्वपूर्ण जबाबदारीची पदे त्यांनी समर्थपणे भूषविली आहेत. राष्ट्रीय पातळीवरील अग्रगण्य वीज क्षेत्रातील कार्याचा सुमारे ३७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांचा आहे.
देश-विदेशात तांत्रिक व प्रशासकीय व्यवस्थापन विषयक अत्याधुनिक प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे त्यात जर्मनी येथे सौर उर्जेचा अवलंब आणि औष्णिक संचांचे लवचिक संचलन, अमेरिका येथे रणनीती आणि नेतृत्वगुण इत्यादींचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. इन्स्टिट्युट ऑफ इंजिनियर्स (इंडिया) या संस्थेचे २०१५ पासून ते सदस्य आहेत.
कोळसा मंत्रालय भारत सरकारच्या प्रशासकीय नियंत्रणातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या नवरत्न कंपनी नेवेली लिग्नाईट कॉर्पोेरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तामिळनाडू येथून संचालक (पॉवर) म्हणून ते ३१ मार्च २०१९ रोजी नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत.