IPL 2019 : पहिला सामना जिंकताच विराटला दंड
   दिनांक :14-Apr-2019
मोहाली,
आयपीएलच्या १२व्या मोसमात सलग सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शनिवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 'युनिव्हर्सल बॉस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलच्या नाबाद ९९ धावांच्या जोरावर १७३ धावा फाटकावल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार विराट कोहली (६७) आणि धडाकेबाज फलंदाज ए.बी. डिव्हिलियर्स (५९) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बंगळुरूने आठ गड्यांनी पंजाबवर मात केली. 
 
 
 
मात्र, पंजाबविरुद्धच्या सामन्यात षटकांचा वेग संथ राखल्यामुळे कोहलीला कारवाईला सामोरे जावे लागले. आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोहलीला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या १२व्या मोसमात षटकांचा वेग संथ राखल्यामुळे कारवाई होणारा कोहली हा तिसरा कर्णधार ठरला आहे. बंगळुरू संघाकडून प्रथमच आयपीएलच्या नियमाचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे कोहलीला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे, असे आयपीएल आयोजकांनी स्पष्ट केले.
 
याआधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे यांना या कारवाईचा सामना करावा लागला होता. पुढील सामन्यांत ही चूक पुन्हा घडल्यास कोहलीवर एका सामन्याची बंदी होऊ शकते. शिवाय कर्णधाराला २४ लाखांचा दंड आणि प्रत्येक खेळाडूच्या मॅच फीमधून २५ % रक्कम दंड म्हणून वसूल केली जाईल. तिसऱ्यांदा चूक घडल्यास कर्णधारावर एका सामन्याची बंदी आणि ३० लाखांचा दंड अशी शिक्षा होईल.