विवाहित महिलेला गावकऱ्यांनी केली विचित्र शिक्षा
   दिनांक :14-Apr-2019
भोपाळ:
 मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील थांदला पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका आदिवासी महिलेला आपल्या नवऱ्याला खांद्यावर घेऊन गावभर फिरविण्याची शिक्षा देण्यात आली होती. या महिलेचे विवाहबाह्य संबंध उघड झाल्याचे सांगत जात पंचायतीने ही शिक्षा सुनावली होती.
 
 
देवीगाव येथे ही घटना घडली असून चक्क महिलेने आपल्या पतीला खांद्यावर घेऊन गावभर यात्रा केली. गावातील लोकांनी महिलेचा अनादर केल्याचं पोलीस अधीक्षक विनित जैन यांनी म्हटले आहे. याप्रकरणी चौकशीसाठी पोलीस दलाला अतिरिक्त पोलीस अधीक्षक, एसडीओपी यांच्यासह गावात पाठवण्यात आले आहे. तसेच, यातील व्हीडिओची तपासणी करून आम्ही संबंधित व्यक्तींवर कारवाई करू, असेही जैन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. विशेष म्हणजे, महिलेच्या सासरच्या मंडळीने आणि गावातील ज्येष्ठ मंडळींनी महिलेला ही शिक्षा सुनावली आहे. या महिलेचे विवाहबाह्य संबंध होते, त्यामुळे पतीला खाद्यावर घेऊन महिलेला गावभर फिरण्याचं बजावण्यात आलं होतं.