साखरेच्या निर्यातीत १७ लाख टनांपर्यंत वाढ
   दिनांक :15-Apr-2019
विजय सरोदे
केंद्राने साखर कारखान्यांना 2018-19 मध्ये 50 लाख टन साखरेची निर्यात करण्यास सांगितले होते. त्याचा उद्देश पडून असलेल्या साखरेची विक्री करून तिच्यामध्ये अडकलेला पैसा मोकळा करणे व ऊस उत्पादकांची थकित रक्कम देता येणे शक्य व्हावे हा होय. भारताचे साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या 3 कोटी 25 लाख टनांच्या तुलनेत यावर्षी 3 कोटी 10 लाख टन इतके घटण्याची शक्यता आहे. पण देशातील साखरेचा खप 2 कोटी 60 लाख टन इतकाच असल्याने कारखान्यांकडे साखरेचे अतिरिक्त साठे पडून आहेत. त्यामुळे साखरेची निर्यात करण्याशिवाय दुसरा तरणोपाय नाही. पण गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचे भाव पडलेले असल्याने तिची फारशी निर्यात होऊ शकली नव्हती. आता परिस्थितीत थोडा बदल होत असून देशातील साखरेच्या निर्यातीला बराच वाव आहे.
 
साखरेच्या प्रचंड उत्पादनामुळे तिचे देशांतर्गत बाजारातील भाव पडल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना त्यांचा फटका बसलेला आहे. साखर कारखान्यांनी तर आम्हाला नुकसान झाले असल्याने शेतकर्‍यांचे पैसे देणे शक्य नसल्याचे सांगून आपले हात वर केले आहेत! त्यामुळे साखर गोड असली तरी ती शेतकर्‍यांसाठी चांगलीच कडू झालेली आहे. अशा परिस्थितीत साखरेच्या निर्यातीमुळे त्यांचे पेमेंट करणे शक्य झाल्यास शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 
सध्याच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी सरकारला पुन्हा अनुकूल कौल मिळण्याची शक्यता अनेक जनमतकौलातून व्यक्त होत असताना शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या विक्रमी उंचीवर आले असल्याचे दिसत आहे. पण कंपन्यांच्या निकालांच्या महिन्यात त्यांच्या कामगिरी वरच बाजाराची वाटचाल अवलंबून राहणार आहे. निवडणुकीचा तसे पाहिले तर बाजारावर फारसा परिणाम होणार नाही. दीर्घकालीन गुंतवणुकीत फायदा अपेक्षित आहे. निवडणुकीचे वर्ष हे बाजाराला अनुकूलच राहिलेले आहे.
 
तज्ज्ञांच्या मते राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) येत्या पाच वर्षांत 25 हजार बिंदूंपर्यंतही झेप घेऊ शकतो. म्हणजे या पंचवार्षिकमध्ये बाजार दुप्पट वाढू शकतो. आगामी काळात बाजार खूप चांगला परतावा (रिटर्न)ही देऊ शकतो. जगातील बाजारा मधील घसरणीचा भारतीय शेअर बाजारावर विशेष परिणाम होत नसतो. उलट जागतिक वाढीचे प्रमाण घटल्याने कच्चे खनिज तेल(क्रूड ऑईल) स्वस्त झाले तर भारताच्या दृष्टीने ते पथ्यावर पडणारच आहे. तसेच देशांतर्गत गुंतवणूकदारां(डीआयआय)चे विक्रीचे आकडे वास्तव चित्र दर्शविणारे नसते. ते आता सरकारी कंपन्यांच्या शेअर्स निगुंतवणुकीमध्ये पैसे गुंतवू लागले आहेत.
 
-advt-
 
एकंदरीत तज्ज्ञांच्या मते- दीर्घकालीन गुंतवणूकीतून बाजाराने चांगले परतावे (रिटर्न) दिलेले आहेत. गेल्या चाळीस वर्षाचा इतिहास पाहिला तर मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांका (सेन्सेक्स)ने खूपच चांगले रिटर्न दिलेले आहेत. अर्थव्यवस्थेची वाढ होत जाणार आहे. तिचा परिणाम बाजारावर होणार आहे. पण अल्पकालावधीत मात्र काहीही होऊ शकते. तसेच बाजारात चढउतारही होऊ शकतात. येत्या दोन आठवड्यांत निफ्टी 12 हजार बिंदूंवरही जाऊ शकतो. भारतीय रिझर्व बँकेकडून पुन्हा एकदा व्याजदर कपात केली जाण्याची शक्यता व्यक्त करीत तज्ज्ञांनी म्हटले आहे की- सध्या खाजगी बँकांमध्ये जास्त गुंतवणूक होऊ लागलेली आहे.
 
तसेच सरकारी बँकांची अनार्जित मालमत्तां(एनपीए)ची समस्या सुटत चाललेली आहे. सरकारी बँकांपेक्षा खाजगी बँकांमध्ये वाढ होत असली, तरी केवळ वाढीवर भर देत गुंतवणूक करणे धोक्याचे असल्याचा इशाराही तज्ज्ञांनी दिलेला आहे. म्हणून प्रदीर्घ कालावधीसाठी चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी.
 
शेवटच्या दोन तासांत वधारला शेअर बाजार; निर्देशांकात लक्षणीय वाढ
आज आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी शेवटच्या दोन तासांत शेअर बाजार किरकोळ तेजीसह सपाटी (फ्लॅट)वर बंद झाला. त्याच्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निदेॅशांक (निफ्टी) व मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) व बँक निफ्टी या महत्त्वाच्या निर्देशांकात लक्षणीय वाढ झाली. निफ्टी सकाळी 11 हजार 512 बिंदूंवर उघडल्यानंतर 11 हजार 578 बिंदूंपर्यंत गडगडून मग 11 हजार 657 बिंदूंच्या वरच्या पातळीवर जाऊन दिवसअखेरीस 46 बिंदूनी वाढून 11 हजार 543 बिंदूंवर बंद झाला. तर सेन्सेक्स 38 हजार 692 बिंदूंवर उघडला व तो 38 हजार 554 बिंदूंपर्यंत कोसळून 38 हजार 818 बिंदूंच्या उच्च पातळीनंतर 160 बिंदूंनी वाढून दिवसअखेरीस 38 हजार 767 बिंदूंवर बंद झाला. बँक निफ्टी 152 बिंदूंनी वाढून दिवसअखेरीस 29 हजार 938 बिंदूंवर बंद झाला. सोने व चांदीत मात्र अनुक्रमे प्रतिदहा ग्रॅम व प्रतिकिलोग्रॅममागे 153 रुपये व 420 रुपयांची वाढ होऊन 31 हजार 903 रुपये व 37 हजार 340 रुपयांवर आले होते. भारतीय रुपया मात्र 26 पैशांनी घसरुन प्रति डॉलरमागे 69 रुपये 18 पैसे झाला होता.
•