खर्चाला घाला आळा
   दिनांक :15-Apr-2019
रिकॉर्ड पॉईंट्‌स किंवा इतर लाभ मिळवण्यासाठी क्रेडिट कार्डचा अतिवापर तुमच्या अडचणी वाढवू शकतो. नोटाबंदीनंतर सर्वसामान्यांच्या प्रत्येक आर्थिक व्यवहारावर आयकर विभागाचं बारीक लक्ष असल्याने क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मर्यादित प्रमाणात खर्च करायला हवा. अनावधानाने केले जाणारे व्यवहार तुमची डोकेदुखी कशी वाढवू शकतात हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
 
 
 
श्रीनगरहून दिल्लीला आलेल्या आदिबला २००९ मध्ये २५ हजार रुपये पगाराची नोकरी मिळाली. आर्थिक वर्ष 2009-10 मधले सात महिने त्याने नोकरी केली. दिल्लीत भाड्याने राहणार्‍या आदिबचं उत्पन्न त्या वेळच्या कररचनेनुसार करपात्र नव्हतं. सुरूवातीच्या काळात आदिबला कुटुंबाकडून आर्थिक मदत मिळायची. ‘रिवॉर्ड पॉईंट्‌स’ मिळवण्याच्या नादात त्याने स्वत:सोबतच मित्रांचे खर्च भागवण्यासाठी क्रेडिट कार्डचा बेसुमार वापर केला. यामुळे त्या आर्थिक वर्षात त्याच्या क्रेडिट कार्डचं बिल दोन लाख रुपयांच्या घरात गेलं.
 
आर्थिक वर्ष २००९-१० चं आयकर विवरणपत्र भरलं नसल्याबद्दल आदिबला २०१३ मध्ये आयकर विभागाची नोटिस मिळाली. त्या आर्थिक वर्षात क्रेडिट कार्डचं बिल दोन लाख रुपयांच्या घरात गेल्याचं कारण यासाठी देण्यात आलं. पण त्या काळात पालकांकडून मिळणार्‍या पैशातून क्रेडिट कार्डाचं बिलं भरत असल्याचं स्पष्टीकरण आदिबने दिलं. पालकांकडून मुलांना मिळणारे पैसे उत्पन्न किंवा करपात्र भेटवस्तू म्हणून गणले जात नसल्याने आयकर विभागाने हे प्रकरण तिथेच मिटवलं. पण यामुळे ‘रिवॉर्ड पॉईंट्‌स’, ‘कॅश बॅक’ला भुलून क्रेडिट कार्डचा अतिवापर न करण्याचा धडा आदिबला मिळाला. या प्रकरणातून आपणही धडा घेणं गरजेचं आहे.