नगर परिषदेच्या जागेवर चायनीजवाल्यांचे बस्तान
   दिनांक :15-Apr-2019

 
 
भंडारा: कुणी अतिक्रमण करताना दिसल्यास जमीन मालकाचा होणारा तिळपापड साहजिक आहे. सातबार्‍यावर त्या मालकाचे नाव असेल तरच त्याच्या तिळपापड होण्याला काही अर्थ उरतो. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासनाच्या मालकीच्या जागांवर कुणी अतिक्रमण करीत असेल तर आवर घालण्यासाठी कुणी पुढे येताना दिसत नाही, ही शोकांतिका आहे. नगर परिषदेच्या मालकीच्या बालोद्यानच्या जागेवर चायनीज विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. परंतु हळूहळू पाय पसरू पाहत असलेल्या या चायनीज विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने नगर पालिका प्रशासन मात्र उदासीन आहे. एक वेळ जागा नगर परिषदेची म्हणून सामान्य माणूस दुर्लक्षही करेल. मात्र या गाड्यांमुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होणार्‍या विपरीत परिणामांचे काय?
प्रशासनाला कधी-कधी जाग येते आणि अतिक्रमणावर बडगा उगारला जातो. मात्र अशा विशिष्ट ठिकाणी जाण्यापूर्वीच मोहीम संपते. त्यामुळे नगर परिषदेच्या मालकीच्या जागांवरील अतिक्रमण निघूच शकत नाही. शहरात बर्‍याच ठिकाणी ही परिस्थिती आहे. मुस्लिम लायब्ररी चौकात नगर परिषदेच्या मालकीची जागा आहे. त्याला तुरस्कर गार्डन असे कधी काळी संबोधले जात होते. प्रत्यक्षात ‘गार्डन’ म्हणावे असे येथे काहीच नाही. मोकळी जागा असल्याने मुलांना खेळाचे मैदान म्हणून या जागेचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. याच मैदानाच्या बाजूला नाल्यावर पत्रे टाकून चायनीज विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.