‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या या कलाकाराला एका शब्दासाठी मिळतात लाखो रुपये
   दिनांक :15-Apr-2019

‘गेम ऑफ थ्रोन्स’ची लोकप्रियता जंगलात जसा वणवा पेटावा त्या वेगाने जगभरात पसरली आहे. सध्या याचे आठवे आणि शेवटचे सत्र सुरू असल्यामुळे चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. आजवरचे सगळे जुने विक्रम मोडून नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या या मालिकेने जगातील सर्वात जास्त मानधन देणारी मालिका म्हणून एक नवा लौकिक आपल्या नावावर करून घेतला आहे. दृश्य माध्यमांत कलाकाराला मानधन देताना त्याचा अनुभव, अभिनयाची शैली, लोकप्रियता आणि व्यक्तिरेखा लक्षात घेतली जाते. परंतु ‘गेम ऑफ थ्रोन्स’ने वेगळ्याच प्रकारे मानधन देण्यास सुरुवात केली.

 
 
 
नेटली डॉरमर, मेसी विलियम्स, सेन बीन, सोफी टर्नर, रिचर्ड मॅडॅन, इयान ग्लेन या कलाकारांनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दासाठी तब्बल २ लाख ९९ हजार रुपये मिळतात. प्रत्येक भागात ५६० शब्द या अभिनेत्यांनी उच्चारले आहेत. याचा अर्थ प्रत्येक भागामागे तब्बल १६.७ कोटी रुपये त्यांना दिले जातात. पहिल्या सहा सत्रांमधील ६० भागांतून या मंडळींनी १०० कोटी २ लाख रुपये कमावले आहेत. या पद्धतीने मालिकेतील सर्वात लोकप्रिय कलाकारांनी अनुक्रमे लीना हेडी २०० कोटी ३ लाख ८० हजार, निकोलाज कोस्टर वाल्डा २०० कोटी ९५ लाख २० हजार, एमिलिया क्लार्क ३०० कोटी ३४ लाख ८० हजार, टीरियन लॅनिस्टर हे पात्र साकारणारा पीटर डिंक्लेज ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील सर्वात लोकप्रिय कलाकार आहे. याने पहिल्या ६ सत्रात ६ कोटी ६० लाख प्रतिशब्द या दराने ३०० कोटी ९६ लाख रुपयांची कमाई केली आहे.
  
‘आयपीएल’ क्रिकेट स्पर्धेत खेळाडूंना मिळणारी रक्कम निश्चित करताना इतिहासातील कामगिरी न पाहता त्यांची सद्यस्थिती लक्षात घेतली जाते. त्यांनी केलेल्या धावांची सरासरी, स्ट्राईक रेट आणि जिंकवलेले सामने यावरून त्यांचे मानधन निश्चित केले जाते. या मालिकेने पैसे देण्याची हीच पद्धत अवलंबली आहे. या कार्यक्रमात कोणती व्यक्तिरेखा किती लोकप्रिय आहे? प्रेक्षक कोणत्या कलाकाराचे संवाद किती वेळा पाहतात? याची आकडेवारी काढून प्रत्येक कलाकाराचा एखाद्या वस्तूप्रमाणे बाजारभाव ठरवला जातो आहे आणि त्या अनुषंगाने त्याने उच्चारलेल्या प्रत्येक शब्दासाठी त्या कलाकाराला पैसे दिले जातात. या पार्श्वभूमीवर विचार करता मालिकेतील काही लोकप्रिय अभिनेत्यांना मिळणाऱ्या मानधनाचे आकडे पाहून थक्क व्हायला होते.